चिपळूण :
बिबट्याने घरात येऊन शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना शनिवारी रात्री 11.30 वाजता वारेली येथे घडली. यात आशिष शरद महाजन (55) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर डेरवण रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महाजन व बिबट्या यांच्यात काही मिनिटे झटापट झाली. यात रक्तबंबाळ झालेले महाजन यांनी अखेर भाल्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात मादी जातीचा बिबट्या ठार झाला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11.30 वाजता घराच्या बाहेरील भागात असणारी पाळीव कुत्री भुंकत असल्याने महाजन हे घराबाहेर आले. यावेळी तेथे त्यांना बिबट्या दिसला. हा बिबट्या त्यांच्या कुत्र्याच्या दिशेने हल्ला करण्यासाठी जात असल्याचे त्यांच्या लक्षात येताच कुत्र्याला बिबट्यापासून वाचवण्यासाठी ते पुढे गेले. यावेळी बिबट्याने महाजन यांच्यावरच हल्ला केला. हा प्रकार त्यांची पत्नी सुप्रिया महाजन यांच्या लक्षात येताच त्यांनी बिबट्यापासून संरक्षण व्हावे म्हणून घरात असलेला टोकदार भाला महाजन यांचेकडे दिला. तोपर्यंत काही मिनिटे बिबट्या व महाजन यांच्यात झालेल्या झटापटीत दोघेही रक्तबंबाळ झाले होते. बिबट्या अधिकच आक्रमकपणे हल्ला करीत असल्याचे महाजन यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या बचावासाठी बिबट्याच्या मानेवर जोराने मारले व पत्नीने दिलेला भाला त्याच्या छातीत घुसवला. यात बिबट्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जखमी झालेल्या महाजन यांना वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. येथीले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी डेरवण रुग्णालयात आणण्यात आले आहे. येथे अतिदक्षता विभागात महाजन यांच्यावर उपचार सुरू आहेत.
- अनेकांची धाव
रात्री या घटनेची माहिती वारेली परिसरात पसरताच अनेकांनी महाजन यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांना रुग्णालयात आणण्यापर्यंतची मदत केली. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनीही रुग्णालयात जाऊन महाजन यांची चौकशी करीत या कुटुंबाला धीर दिला.
- वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी दाखल
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याची तपासणी केली असता तो मृत असल्याचे स्पष्ट झाले. मादी जातीची बिबट्या अंदाजे 1 वर्ष सहा महिने ते 2 वर्षाची असल्याचे आणि बिबट्याच्या छातीवर मोठी तर पाय, मानेवरही जखम असल्याचे दिसून आले. बिबट्याच्या नाकाच्या शेंड्यापासून शेपटीच्या टोकापर्यंत लांबी 190 से.मी. होती. पुढील पायाची उंची 54 तर मागील पायाची उंची 60 से.मी इतकी होती. पंजे, नखे, मिशा, दात सुस्थितीत होते. या बिबट्याला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेल्याचे येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या मुख्य वनरक्षकांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.
- तू घरात जा
एकीकडे बिबट्याच्या हल्ल्यातून कुत्र्याला वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची लावलेली बाजी तर दुसरीकडे बिबट्याच्या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेला पती पाहून महाजन यांच्या पत्नी सुप्रिया यांनी भाला देण्याबरोबरच त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक बिबट्या तिलाही जखमी करेल असे महाजन यांना वाटल्याने त्यांनी तू घरात जा, बाहेर येऊ नको अशी सक्त ताकीद दिली. यामुळे त्या या हल्ल्यातून बचावल्या.
- एक आदर्श शेतकरी
महाजन हे मूळचे पुणे येथील आहेत. त्यांनी वारेली येथे 7 ते 8 एकर जागा घेऊन घर बांधले आहे. तसेच उर्वरित जागेत विविध प्रकारची शेती फुलवली आहे. मोठ्या प्रमाणात भाजीपाला केला असून झाडेही लावली आहेत. तसेच जनावरेही पाळली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ग्रामस्थ एक आदर्श शेतकरी म्हणून पाहिले जाते. त्यांचे घर वारेली–तोंडली सीमेवर जंगल भागात आहे.
- सौरउर्जेचा शॉक तरीही
महाजन यांनी संपूर्ण परिसरात कायम उजेड असावा म्हणून सौरऊर्जा प्रकल्प राबवला आहे. त्यामुळे बाहेरून घरात घुसण्याचा प्रयत्न झाल्यास याच सौरऊर्जेचा शॉकही लागतो अशी माहिती पुढे येत आहे. असे असताना बिबट्या नेमका कोणत्या मार्गाने आला, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
- 2011 च्या घटनेची आठवण
2011 साली ओमळी–कांबळेवाडी येथील कातकर नामक व्यक्तीच्या घरात घूसून बिबट्याने महिलेसह तिघांवर असाच प्राणघातक हल्ला केला होता. यानंतर तो पळून गेला होता. त्यानंतर जखमी झालेले तिघेही बरे झाले. मात्र वारेली येथील घटनेमुळे या घटनेची तालुक्याला आठवण झाली.








