पुणे / प्रतिनिधी :
भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हल्ल्याची सरकारने कसून चौकशी करावी. आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पत्रकार परिषदेत केली. मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्रिपद आम्हाला मिळावे, असे बैठकीत सांगितल्याचेही त्यांनी नमूद केले.
आठवले म्हणाले, नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. म्हणूनच आझाद यांच्यावरील हल्ल्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. विचारांची लढाई विचाराने लढायची असते. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये ज्यांनी हल्ला केला, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मित्र पक्षांची बैठक मुंबईत पार पडली आहे. त्यात मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्रिपद आम्हाला मिळावे. विधान परिषदेमध्ये जागा मिळावी आणि स्थानिक स्वराज संस्था आगामी निवडणुकीत जागा मिळाव्यात, अशी मागणी आम्ही केली आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण रोटेशन पद्धतीने केले जात आहे. त्यामुळे जिथे वस्ती नाही, त्याजागी आमचा माणूस निवडून येणार नाही. दलित वस्ती गावात एका बाजूला असते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आमची मागणी आहे, की, रोटेशन पद्धत बंद करावी आणि जिथे वस्ती त्याठिकाणीच आरक्षण मिळावे, याकडेही आपण लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्ष एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जमवाजमव करून एकजूट करत आहेत. मात्र, त्याचा परिणाम मोदी यांच्यावर होणार नाही. त्यांचे नेतृत्व सक्षम असून ते जगात लोकप्रिय आहेत. त्यामुळेच त्यांचे अमेरिकेत जोरदार स्वागत झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा अधिक जागा भाजपा व मित्र पक्षांना मिळतील. विरोधक जितके एकत्र येतील, त्या प्रमाणात मोदी जनतेपर्यंत पोहचतील. वेगवेगळय़ा क्षेत्रात भारताने आघाडी घेतलेली असून रोजगार निर्मितीस प्राधान्य देण्यात आले आहे. दहा लाख लोकांना एक वर्षात सरकारी नोकरी देण्याचे काम केले जात आहे. खासगी उद्योगास प्रोत्साहन दिले जात असून, लोकांनी त्याचा फायदा घ्यावा. राज्यात उद्योग वाढवण्याचे प्रयत्न सरकार करत असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. विरोधकांनी केवळ विरोध न करता सरकारला सहकार्य करणे, ही लोकशाही आहे. प्रत्येक गोष्टीला विरोध करणे चुकीचे आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नसून आमच्या आरक्षणास धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण त्यांना द्यावे. भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आम्ही अभ्यास करत आहोत. त्याचा फायदा सर्व समाजाला होईल. जातीनिहाय जनगणना झाली, तर जातीचे प्रमाण सर्वांना कळेल. ओबीसी समाजाला त्याचा फायदा होऊ शकेल, याबाबत सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे, असेही आठवले यांनी यावेळी नमूद केले.