शिक्षण अधिकाऱ्यांना धरले धारेवर
म्हापसा : म्हादई बाबत शाळामध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती मात्र त्या स्पर्धेला शाळामधून कुणीही विद्यार्थ्यांनी जाऊ नये असा आदेश बार्देशचे सहाय्यक शिक्षण संचालक अधिकारी किरण चौकेकर यांनी आपल्या बार्देश तालुक्यातील 57 शाळांना वॉट्सअॅप्दवारे संदेश करून पाठविला असता ही बाब सेव्ह म्हादई सेव गोवा फ्रंटच्या पदाधिकाऱ्यांना समजल्यावर मंगळवारी सायंकाळी उत्तर गोवा शिक्षण कार्यालयात धाव घेऊन अधिकाऱ्यांना बरेच धारेवर धरीत हा म्हादईचा पाचवा मुद्दा त्वरित रद्द करावा अशी मागणी केली. मात्र अधिकारी ते करण्यास तयार होत नसल्याने या पदाधिकाऱ्यांनी आपला इंगा दाखविताच अखेर त्या अधिकाऱ्याला तो मुद्दा रद्द करावा लागला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बार्देश तालुक्यात एकूण 57 शाळा विद्यालये असून म्हादई बाबत खास वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बार्देशचे सहाय्यक शिक्षण संचालक श्री किरण चौकेकर यांनी आपल्या वॉट्सअॅप ग्रुपमध्ये कुठलेच शिक्षक वा कुठल्याच विद्यार्थ्यांना म्हादईबाबत बैठक, कार्यक्रम, स्पर्धेत भाग घेऊ नये वा म्हादीबाबत कोणताच कार्यक्रम आखू नये असे स्पष्ट केले व तो संदेश बार्देश तालुक्यातील त्यांच्या हद्दीत येणाऱ्या एकूण 57 शाळा विद्यालयाच्या प्रमुख शिक्षकांना पाठविल्या याची माहिती म्हादईच्या प्रेमीना लागल्यावर त्यांनी म्हापसा शिक्षण उपविभाग कार्यालयात धाव घेऊन जाब विचारली. सेव्ह म्हादई सेव्ह गोवा फ्रंटचे पदाधिकारी प्रजल साखरदांडे, हृदयनाथ शिरोडकर, महेश म्हांबरे, राजेंद्र घाटे, जॉन मेंडोस, पार्वती नागवेकर, अमृत आगारवाडेकर, अमन लोटलीकर, अॅङ शशांक नार्वेकर, जीतेश कामत आदींनी बार्देश शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली व याबाबत माहिती जाणून घेतली असता शिक्षण अधिकारी चौकेकर यांनी हा आदेश आपण वॉट्सअॅप ग्रुपद्वारे आपण दिल्याचे स्पष्ट केले. बार्देशात 57 शाळा असून प्रत्येकाला फोन लागत नाही मात्र संदेश पाठवून एकत्रित ग्रुपवर ही माहिती संबंधित शाळा प्रमुखाना पाठविल्याचे ते म्हणाले. मात्र हा आदेश डिलीट करण्यास त्यांनी नकार दिला.
दबाव आल्यावर संदेश रद्द
यावेळी काही वेळ वातावरण तंग झाले. शिक्षण अधिकारी व मदई प्रेमी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. म्हादईबाबत आम्ही काहीच खपवून घेणार नाही. असा इशारा यावेळी देण्यात आला तरी तो आदेश रद्द करण्यास तयार होईना. अखेर सर्वांनी त्यांना घेराव घालून म्हादईबाबत जाब विचारल्यावर ते राजी झाले. यावेळी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रकारही घडला. अखेर दबावपोटी शिक्षण अधिकाऱ्यांनी तो संदेश शेवटी रद्द करीत असल्याचा संदेश सर्व शाळा प्रमुखांना पाठविल्यानंतर हे म्हादई प्रेमी माघारी फिरले.









