ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अमरावती पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्ताने पुण्यात पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून आपले आयुष्य संपवले. पुण्यातील बाणेर परिसरात पहाटे 4 च्या सुमारास ही घटना घडली.
भरत गायकवाड असे संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते अमरावती पोलीस दलाच्या राजपेठ विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांचे कुटुंब पुण्यातील बालेवाडी परिसरात वास्तव्याला होतं. सुटीवर पुण्यात आलेल्या गायकवाड यांनी पत्नी मोनी गायकवाड (वय 44) आणि पुतण्या दीपक गायकवाड (35) यांची पहाटे 4 च्या सुमारास खासगी पिस्तूलातून गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.