दुसऱया महायुद्धानंतरचा जपान हा आपली महायुद्धकालीन ओळख पुसून टाकण्याच्या प्रयत्नास लागला होता. कारण हिटलरच्या आर्य वंशवादापेक्षा गुणात्मकरित्या वेगळा परंपरावादी आंतरमशियाई वंशवादाची किंमत हिरोशिमा-नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यातून आणि पर्यायाने बिनशर्त शरणागतीतून त्याला भोगावी लागली होती. दुसऱया महायुद्धानंतर अमेरिकेच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वर्चस्वाखालील जपानचा प्रवास बऱयाच प्रमाणात लोकशाहीवादी दिशेने होत गेला. या काळात पाश्चात राष्ट्रांशी सौहार्दपूर्ण संबंध आणि उद्यमशिलतेतून विकास अशी जपानची वाटचाल होत राहिली. काही किरकोळ अपवाद वगळल्यास ती निर्विघ्न आणि निश्चित अशीच राहिली. या साधारणतः सत्तर वर्षांच्या जपानच्या स्थिर समाज-राजकीय प्रवासास आकस्मिक धक्का देणारी घटना गेल्या आठवडय़ात म्हणजे 8 जुलै 2022 रोजी घडली. ती म्हणजे, केवळ जपानमध्येच नाही तर जागतिक पातळीवर, लोकप्रिय बनलेले जपानचे माजी पंतप्रधान शिंझो ऍबे यांची गोळय़ा घालून हत्या. दीर्घकाळ जपानच्या पंतप्रधानपदावर राहिलेल्या ऍबे यांनी 2020 साली प्रकृती अस्वास्थाच्या कारणावरून पंतप्रधानपद सोडले होते. याचाच अर्थ त्यांची लोकप्रियता अबाधित असतानाच ते पायउतार झाले. दोन मुदतीत जवळपास दशकभर जपानचे पंतप्रधानपद सांभाळणारे शिंझो ऍबे हे जपानच्या इतिहासात सर्वाधिक काळ या पदावर असणारे व्यक्तिमत्त्व होते.
2006 ते 2007 च्या अल्प कारकीर्दीनंतर 2012 ते 2020 पर्यंत ऍबे यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळला. 2012 साली जेव्हा त्यांनी देशाची सूत्रे हाती घेतली तेव्हा जपान काहीशा बिकट मार्गावरून मार्गक्रमण करीत होता. चीनची आर्थिक झेप आणि विस्तारवाद जपानसाठी त्रासदायक ठरत होता. 2011 च्या आसपास भूकंप आणि त्सुनामीने नागरिक हवालदिल झाले होते. विदेशी गुंतवणुकीवर परिणाम झाला होता. अशावेळी वित्तीय सुलभता, अधिक सार्वजनिक खर्चास प्राधान्य आणि उदारीकरण ही आर्थिक त्रिसुत्री वापरून ऍबे यांनी मंदीत आलेली अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर आणली. त्याचे आर्थिक धोरण जगभरात ‘ऍबे इकॉनॉमिक्स’ म्हणून ओळखले गेले. नैसर्गिक आपत्यांमुळे जी वित्तहानी झाली होती त्याची दखल घेऊन विविध स्तरांवर पुर्नबांधणीचे काम ऍबे यांनी तडीस नेले. दुसरीकडे त्यांनी लष्करास अधिक महत्त्वपूर्ण भूमिका देण्यासाठी अमेरिकेच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली जपानची राज्यघटना पुर्नलिखित करण्याचे प्रयत्नही केले. त्याचबरोबरीने दुसऱया महायुद्धात मृत्यू पावलेल्या आणि युद्ध गुन्हेगारांचाही अंतर्भाव असलेल्या स्मृतीस्थळास त्यांनी दिलेली भेट या भूमिका मात्र काहीशा वादग्रस्त ठरल्या. तथापि अमेरिका, युरोपियन देश आणि भारतासारख्या आशियाई देशांशी मित्रत्वाचे संबंध, व्यापार, गुंतवणूक, सांस्कृतिक देवाण-घेवाण, पर्यटनास उत्तेजन या माध्यमातून ऍबे यांनी प्रस्थापित केले आणि जागतिकीकरणाचा पुरस्कार करणारा पूर्वेकडील मित्र अशी त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर छबी बनली. चीनच्या वाढत्या प्रभावास अटकाव करण्यासाठी देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर अधिक खर्च करण्याबरोबरच जपान, भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांच्या संरक्षण विषयक ‘क्वाड’ या मंचाचे ते कट्टर पुरस्कर्ते बनले.
पंतप्रधानपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतरही शिंझो ऍबे आपल्याला झेपेल तसे पक्षकार्य करीत होते. प्रतिनिधी सभेचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. शुक्रवार दि. 8 जुलै रोजी यामाटो-सैदाजी स्टेशन, या नारा नारा विभाग कार्यक्षेत्रात आपल्या लिबरल डेमोक्रॅटीक पार्टीच्या प्रचार मोहिमेत बोलत असताना त्यांच्यावर जवळून पाठीमागून गोळय़ा झाडण्यात आल्या. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आणि तेथेच मृत घोषित करण्यात आले. दुसऱया महायुद्धानंतर राजकीय हत्यांना क्वचितच सामोरी गेलेल्या जपानी जनतेवर या घटनेचा जबर मानसिक आघात झाला आहे. त्याचबरोबरीने जपानी गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था यावरही प्रश्नचिन्ह उभे केले गेले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व माहितीचा पुरस्कार करणाऱया आणि या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जपानमध्ये हे घडलेच कसे असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.
मुख्य प्रश्न हा होता की, शिंझो ऍबेसारख्या कार्यक्षम आणि लोकप्रिय नेत्याची हत्या कोणी व का करावी हा या प्रश्नाचे उत्तर, जितके धक्कादायक तितकेच क्षुल्लक वाटले तरी त्याच्या अंतरंगात अनेक बारीक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय धागे गुंतलेले आहेत. या हत्येप्रकरणी हत्या करून तेथेच थांबलेल्या तेत्सुया यामागामी या 41 वर्षीय व्यक्तीस अटक करण्यात आली. त्याने या हत्येची कबुली दिली. कधीकाळी जपानच्या नौदलात सेवा बजावणाऱया आणि त्यानंतर मालवाहू वाहन चालक म्हणून काम करणाऱया यामागामीच्या नावावर हत्येपूर्वी कुठलाच गुन्हा नोंदलेला नाही. शांत स्वभावाचा म्हणून ओळखल्या जाणाऱया यामागामीने मे 2022 मध्ये तब्येत बरोबर नसल्याचे कारण देऊन वाहन चालकाची नोकरी सोडली होती आणि तो तेव्हापासून बेरोजगार होता. शिंझो ऍबे यांच्या हत्येचे कारण सांगताना तो म्हणाला, ‘ही हत्या मी कोणत्याही राजकीय हेतूने केली नसून वैयक्तिक कारणामुळे केली आहे. जपानमधील ‘युनिफिकेशन चर्च’ नामक धार्मिक संस्थेस माझ्या आईने सदस्य म्हणून मोठय़ा प्रमाणात देणग्या दिल्या. वडिलोपार्जित जमीन, याशिवाय रहाते घर अशी सुमारे 100 दशलक्ष येनची देणगी युनिफिकेशन चर्चला दिल्यामुळे आपण कुटुंबासह दिवाळखोर बनलो. आपल्याला अकारण गरिबीत दिवस काढावे लागले, याबाबत मला सदर धार्मिक संस्थेबाबत चीड निर्माण झाली होती. त्यातच शिंझो ऍबे हे या चर्च संस्थेचा प्रभाव जपानवर वाढविण्यास कारणीभूत ठरले आहेत, असा विश्वास मला वाटू लागला आणि या समजातून मी त्यांना नाहीसे केले? मारेकरी यामागामीच्या या कबुलीनंतर जपान आणि जगभरात युनिफिकेशन चर्च हा चर्चेचा विषय ठरला आहे.
शिंझो ऍबे यांच्या हत्येआधी युनिफिकेशन चर्चच्या उच्चस्तरीय पदाधिकाऱयांना ठार करण्याचा प्रयत्न यामागामीने केला होता. परंतु ते निष्फळ ठरले. या संदर्भात युनिफिकेशन चर्चचा इतिहास पहाता ही संस्था द. कोरियात 1954 साली सन म्युंग मून यांनी स्थापन केली. पुढे तिचा जपानसह जगात विस्तार झाला. या धार्मिक चळवळीच्या सदस्यांना ‘मुनीज’ म्हणूनही ओळखले जाते. संस्थापक सन म्युंग मून हे त्यांच्या कडव्या कम्युनिस्ट विरोधासाठी ओळखले जात. त्यामुळे जपानसह जगातील इतर पुराणमतवादी राजकारण्यांना ते सहज जवळ करू शकले. त्यानंतरच्या काळात जगभरात या संस्थेची सदस्य संख्या तीन दशलक्षाच्यावर गेली. आणि मोठय़ा प्रमाणात मिळणाऱया देणग्यांद्वारे सामूहिक विवाह आणि इतर कार्यक्रमांवर संस्थेने भर दिला. काही जण संस्थेचा उल्लेख उपरोधाने ‘आर्थिक फायद्याने प्रेरित झालेला पंथ’ असाही करू लागले. या पार्श्वभूमीवर जपानमधील ‘आध्यात्मिक विक्री विरोधी राष्ट्रीय प्रसारण यंत्रणा’ या वकिलांच्या संघटनेने ऍबे हत्येनंतर पत्रकार परिषद घेऊन जपानी राजकारण्यांनी युनिफिकेशन चर्चसारख्या संस्थांपासून दूर रहावे. त्यांना उत्तेजन मिळेल असे कृत्य करू नये, असे आवाहन केले आहे. सदर वकिलांची संघटना युनिफिकेशन चर्चच्या मोहजालात फसून देणग्या देण्यास तयार होणाऱया जपानी नागरिकांना परावृत्त करण्यासाठी, कायदेशीर मदत करण्यासाठी कार्यरत आहे.
अनिल आजगावकर








