रवींद्र मडगावकर पालकमंत्र्यांचे वेधणार लक्ष
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी- बेळगाव राज्य मार्गदरम्यान माडखोल गावातील राज्य मार्गाचे करण्यात आलेले रस्ता नुतनिकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पहिल्याच पावसात उखडले आहे. याला संबंधित ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जबाबदार असून याबाबत राज्याचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे जिल्हा बँक संचालक तथा माजी सभापती रवींद्र मडगावकर यांनी सांगितले.माडखोल गावातून जाणाऱ्या या राज्य मार्गाची अनेक ठिकाणी दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्याच्या नुतनिकरणाची मागणी होती. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात उखडले. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे. सदरचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे न केल्यामुळे तसेच निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच याचा फटका वाहन चालकांना बसणार आहे.
या निकृष्ट दर्जाच्या कामाला संबंधित ठेकेदारासह अधिकारी वर्गाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असुन वाहन चालनकांमधुन नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत लवकरच जिल्हा दौऱ्यावर येणारे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे रवींद्र मडगावकर यांनी सांगितले.









