साऱ्यांना दिलासा : तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी
बेळगाव : ड्रेनेजची पाईपलाईन घालण्यासाठी अनगोळ येथील रघुनाथपेठ ते संतमीरा रोड, कलमेश्वर गल्ली, मारुती गल्ली या परिसरात खोदाई करण्यात आली होती. खोदाई केल्यानंतर ती चर योग्य प्रकारे बुजविण्यात आली नाही. रस्त्यावरच माती पसरुन होती. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले होते. मात्र आता रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात करण्यात आल्याने धुळीपासून नागरिकांची सुटका होणार आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. रघुनाथपेठ, वाडा कंपाऊंड येथे घालण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामामुळे रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली होती. गणेशोत्सवापूर्वीच ही खोदाई केली होती. तेव्हापासून नागरिकांना चिखल व धुळीच्या साम्राज्याचा त्रास सहन करावा लागला. रस्त्यावरील माती व्यवस्थित काढली नव्हती. त्याचबरोबर चरीही बुजविण्यात आल्या नव्हत्या. त्या चरींमध्ये वाहने अनेकवेळा अडकून पडत होती. बऱ्याच ठिकाणी ख•s पडल्यामुळे नागरिकांतून अनेकवेळा तक्रारी केल्या. पाईपलाईन घातल्यानंतर चर चर बुजविली नाही. त्यामुळे अनेक अपघातही घडले होते. चरीमध्ये दगड टाकले होते. डांबरीकरण करावे, अशी मागणी वारंवार केली. पण त्याकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष केले होते. या धुरळ्यामुळे व्यावसायिकांना तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र आता डांबरीकरणाला सुरूवात झाल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. लवकरात लवकर डांबरीकरण पूर्ण करून दिलासा द्यावा.









