तिसरे रेल्वे गेट उड्डाण पुलावरील प्रकार, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर
बेळगाव : सहा महिन्यांपूर्वी डांबरीकरण केलेला रस्ता उखडून गेल्याचा प्रकार टिळकवाडी येथील तिसरा रेल्वे गेट उड्डाण पुलावर घडला आहे. डांबर उखडून सध्या ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अनगोळ रेल्वे गेट बंद असल्यामुळे सर्व वाहतूक उड्डाण पुलामार्गे फिरविल्याने वाहनाची संख्या वाढली असताना आता पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. काही महिन्यांपूर्वी शहरातील उड्डाणपुलांचे विशेष निधीतून डांबरीकरण करण्यात आले. कपिलेश्वर उड्डाणपूल तसेच तिसरे रेल्वे गेट उड्डाणपुलावरील डांबरीकरण करण्यात आले. परंतु अवघ्या सहा महिन्यातच डांबरीकरण उखडून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निकृष्ट प्रतीच्या साहित्याचा वापर करण्यात आल्याचा प्रश्न आता वाहनचालकांतून व्यक्त केला जात आहे.
मागील वर्षी तिसरे रेल्वे गेट उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे टीकेची झोड उठली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर भरपावसात तात्पुरत्या स्वरुपात खड्डे भरण्यात आले होते. दिवाळीनंतर रस्त्याचे डांबरीकरण झाले खरे. परंतु अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. बेळगावच्या दिशेने उद्यमबागला जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रात्रीच्यावेळी खड्डे निदर्शनास न आल्याने अपघात होत आहेत. अनगोळ येथील रेल्वे गेट बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ही सर्व वाहतूक तिसरे रेल्वे गेटमार्गे वळविण्यात आली आहे. वाहतूक वाढल्याने उड्डाणपुलावर सकाळी व संध्याकाळच्या वेळेला केंडी होत आहे. त्यातच खड्डे चुकविताना अपघात होऊन वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे या ठिकाणचे खड्डे तात्काळ भरावेत, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.









