कराड :
मुंबई, पुण्यानंतर मंगळवारी माघी पौर्णिमेच्या मुहूर्तावर फळांचा राजा देवगड हापूस कराडच्या बाजारपेठेत दाखल झाला. नेहमीप्रमाणेच हंगामाची सुरवात असल्याने सध्या तीन ते साडेतीन हजार रूपये डझनच्या दराने हापूसची विक्री होत असून सर्वसामान्यांना मात्र आंबा खाण्यासाठी दर उतरण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
दरवर्षी साधारणतः १ फेब्रुवारीच्या दरमान्य देवगड हापूसचे कराडच्या बाजारपेठेत आगमन होते. यावर्षी वातावरणातील बदलामुळे हापूसचे आगमन जवळपास १० ते १२ दिवसांनी लांबणीवर पडले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत मुंबई व पुण्यात हापूस विक्रीसाठी दाखल झाला होता. यानंतर बुधवारी माघी पौर्णिमेच्या मुहुर्तावर कराडच्या बाजारपेठेतील हापूस आंब्याचे व्यापारी जाधव बंधू दुशेरेकर यांच्या दुकानात हापूसचे आगमन झाले.
हंगामाची सुरवात असल्याने हापूस आंब्याचा दर तीन ते साडेतीन हजार रूपये डझन आहे. तरीही खवैय्यांकडून हापूसची खरेदी होत आहे. हापूसची आवक वाढल्यानंतर दर कमी होतील, अशी माहिती सम्राट जाधव दुशेरेकर यांनी दिली. आणखी काही दिवसांनी देवगड बरोबरच रत्नागीरी हापूस व स्थानिक आंब्यांची आवक बाजारपेठेत वाढल्यानंतर दर कमी येत असल्याने सर्वसामान्यांना आंबा खाण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.








