फेरीवाले, भाजीविक्रेत्यांसह खरेदीदारांची उडाली तारांबळ : काही पिकांना दिलासा
बेळगाव : सोमवारीही वळिवाने पुन्हा हजेरी लावली असून काहीवेळ पाऊस पडला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण व उष्मा जाणवत होता. पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र पावसाचा केवळ शिडकावा झाला. त्यामुळे पुन्हा उष्म्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. पावसामुळे बाजारपेठेतील बैठेव्यापारी व फेरीवाल्यांची धावपळ उडाली. एप्रिल महिन्याला सुरुवात झाल्यानंतर वळीव पावसाचे आगमन होत असते. गेल्या काही वर्षांमध्ये तर फेब्रुवारीपासूनच वळीव पावसाला सुरुवात होत होती. मात्र यावर्षी एप्रिलमध्ये वळिवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या काही भागामध्ये बटाटा, रताळी काढणी सुरू आहे. त्यांना या पावसाचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. सोमवारी दुपारी 4.30 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे फेरीवाले, भाजीविक्रेते, बैठेव्यापारी यांना त्रास सहन करावा लागला. काहीवेळच पाऊस पडला. मात्र साऱ्यांची तारांबळ उडाली होती. या पावसामुळे पादचारी तसेच दुचाकीस्वारांनाही आडोसा शोधावा लागला. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही पावसाचा त्रास सहन करावा लागला.









