कर्नाटकातील आंबाही दाखल : 700 ते 1400 रुपये प्रतिडझन
बेळगाव : फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याची आवक वाढू लागली आहे. तळकोकणातील मालवण, देवगड आणि रत्नागिरी येथून हापूस दाखल होऊ लागला आहे. त्याचबरोबर कर्नाटकातील आंब्याचीही आवक होत असल्याने दर खाली येतील, अशी अपेक्षा आहे. विविध फळांनी बाजारपेठ बहरू लागली आहे. त्यामध्ये आंबाही पाहावयास मिळत आहे. आझादनगर येथील होलसेल फ्रुट मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे. साधारण हापूसचा दर 700 ते 1400 रुपये डझन आहे. गुढीपाडव्यानंतर आंब्याची आवक पुन्हा वाढेल आणि दर काहीसे कमी होतील, अशी माहिती आंबा विक्रेत्यांनी दिली आहे. कर्नाटकातील धारवाड, बेंगळूर आणि इतर ठिकाणी आंबा दाखल झाल्यानंतर दर काहीसे कमी होतील, अशी आशाही ग्राहकांना आहे. सद्यस्थितीत आंब्याचे दर अधिक असल्याने सर्वसामान्यांना आंब्याच्या चवीपासून लांब राहावे लागले आहे. कोकणातील हापूसबरोबर कर्नाटकातील आंबा हळूहळू येऊ लागला आहे. उष्म्यामुळे फळांना पसंती अधिक दिली जात आहे. सफरचंद, डाळिंब, संत्री, मोसंबी, अननस, कलिंगड आदी फळांचीही रेलचेल पाहावयास मिळत आहे. होलसेल फळबाजारात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटकातील इतर जिल्ह्यांतून आंबा आवक वाढू लागली आहे. विशेषत: हापूस आंब्याची विक्री अधिक होते. त्यामुळे कोकणातील आंब्याकडे लक्ष आहे. यंदा वाढत्या उष्म्यामुळे आंबा उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज बागायत खात्याने वर्तविला होता. बागायत खात्यामार्फत दरवर्षी आंबा महोत्सव भरविला जातो. त्यामध्ये विविध जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन व विक्रीही होते. त्यामुळे शहरवासियांना आंबा महोत्सवाचे वेध लागले आहेत.









