वाजत गाजत गणरायांचे आगमन; स्थानिकांसह जळगाव, कर्नाटक, सोलापूर, यवतमाळ, इस्लामपूरचे ढोल-ताशे कोल्हापुरात दाखल
कोल्हापूर प्रतिनिधी
घराघरात ढोल, ताशे, हालगी, झांजपथक यासह अन्य पारंपारिक वाद्याच्या गजरात गणरायांचे आगमन झाले. कोरोनानंतर गणरायांचे स्वागत करण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह होता. त्यामुळे कुंभार गल्ली, पापाची तिकटी, बापट कँप ते घरापर्यंत वाजत-गाजत गणरायांना घेवून जाण्यासाठी पारंपरिक ढोल-ताशाला प्रचंड मागणी होती. त्यामुळे दोन वर्षानंतर यंदा साऊंड सिस्टमसह पारंपारिक वाद्यांना अच्छे दिन आले आहेत.
कोरोनात दोन वर्षे साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे पारंपारिक वाद्ये, साऊंड सिस्टम यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. यंता मात्र गणरायांच्या आगमनावेळी भाविकांच्या चेहऱयावर आनंद दिसत होता. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात आणि पारंपारिक वाद्यांच्या तालावर लहान-मोठे भाविक नाचत होते. गुलाल आणि चिरमुऱयांची उधळण करीत आनंद व्यक्त करीत होते. चौकाचौकात उपस्थित ढोल-ताशे पथकांनी ताशी 300 ते 500 रूपये दर लावला होता. तरीही भाविकांनी मागेल तेवढे पैसे देवून वाजत-गाजत गणरायांचे स्वागत केले. गेल्या दोन दिवसापासून परगावचे ढोलताशे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहेत. घरगुती गणरायांच्या आगमनासाठी पारंपारिक वाद्यांना अधिक मागणी दिसली. या वाद्यांचा वेगळा आणि विलोभनीय आवाज सर्वांना मंत्रमुग्ध करतोच, परंतू रूग्णांनाही त्याचा त्रास होत नाही. त्यामुळे कोल्हापुरातील बऱयाच घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल-तशालाच्या गजरात गणरायांचे स्वागत केले. वर्षभर छोटय़ा मोठय़ा समारंभात मिळेल त्या पैशात या पथकांनी काम केली. गणेशोत्सव मात्र दणक्यात होणार असल्याने या पथकांच्या हाताला काम मिळाले आहे. बुधवारी दिवसभरात विविध ढोल-ताशे पथकांचा हजारो रूपयांचा व्यवसाय झाल्याने त्यांच्या चेहऱयावरील आनंद ओसंडून वाहात होता. गणरायांच्या आगमनानंतर पुन्हा घरी जावून विसर्जनावेळी येणार असल्याचे ढोल-ताशे पथकाच्या प्रमुखांनी सांगितले.
ढकलगाडीलाही मागणी
गणरायांना घरापर्यंत घेवून जाण्यासाठी कुंभार गल्लीपासून काही अंतरावर असलेल्या कुटुंबियांनी ढकलगाडीतून गणेशमूर्ती घरी घेवून जात प्रतिष्ठापना केली. त्यामुळे ढकलगाडीलाही मोठी मागणी होती. तासाला 300 रूपयांपासून पुढे ढकलगाडीचे दर होते. त्यामुळे अनेक भाविकांनी एकत्र येत एका ढकलगाडीतून दोन तीन गणेशमूर्ती एकत्रीपणे घरी घेवून गेले. गणेश आगमनाला ढकलगाडीवाल्यांनाही चांगला रोजगार मिळाला.









