मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने कारवाई
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेनला मारल्याचा दावा करणारा माजी अमेरिकन नौसैनिक सील रॉबर्ट जे. ओनील मोठ्या संकटात आहे. 47 वषीय माजी अमेरिकन सैनिकाला दक्षिण अमेरिकेतील टेक्सास राज्यातील फ्रिस्को शहरातून अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॉबर्टवर शारीरिक दुखापत करून मारहाण केल्याचा आरोप आहे. हा आरोप गंभीर नसला तरी त्याच्यावर कारवाई झाल्यामुळे सध्या या घटनेची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. कारागृह नोंदीमध्ये त्याच्यावर मारहाणीचा आरोप नोंदवला गेला आहे. ओनीलला अटक झाल्यानंतर त्याच दिवशी 3,500 डॉलर्सच्या बॉन्डवर सोडण्यात आले आहे. फ्रिस्को पोलिसांनी या प्रकरणाची अधिक माहिती देण्यास नकार दिला.
आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करणाऱ्या पथकामध्ये ओनील याचा सहभाग होता. ओसामाला मारण्यात आपली भूमिका सांगितल्यानंतर ओनील प्रसिद्धीच्या झोतात आला होता. ओसामा बिन लादेन हा अमेरिकेवर 11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. लादेनला 2011 मध्ये पाकिस्तानातील अबोटाबाद येथे एका धडक कारवाईत मारण्यात आले होते.









