सैन्य उपप्रमुखांचे वक्तव्य : चीन अन् पाकिस्तानचे आव्हान
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारतीय सैन्य पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांना लागून असलेल्या सीमांवर मजबूत असून कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे उद्गार सैन्य उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमनी यांनी काढले आहेत. सैन्य उपप्रमुख शनिवारी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये पासिंग आउट परेडमध्ये सामील झाले.
भारतीय सैन्य नेहमीच नव्या आव्हानांसाठी तयार आहे. पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर आम्ही मजबूत असून कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहोत असे त्यांनी म्हटले आहे. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये परमेश्वरन ड्रिल स्क्वेयरमध्ये मिलिट्री परेडनंतर सैन्याला 297 नवे अधिकारी मिळाले आहेत. यात शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या पुरुष अधिकाऱ्यांची 118 वी तुकडी आणि महिला अधिकाऱ्यांची 18 वी तुकडी सामील आहे. पासिंग आउट परेडमध्ये मित्रदेशांच्या 10 कॅडेट अधिकारी आणि 5 कॅडेट अधिकाऱ्यांनी (महिला) देखील यशस्वीपणे स्वत:चे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
सैन्य उपप्रमुखांनी स्वत:च्या संबोधनात कॅडेट अधिकारी आणि ओटीए कर्मचाऱ्यांच्या अनुकरणीय कामगिरीसाठी त्यांचे कौतुक केले आहे. तुम्हाला लवकरच जगातील काही सर्वोत्तम सैनिकांची कमांड सांभाळण्याचे सौभाग्य प्राप्त होणार आहे. हे सैनिक तुमची सर्वात मूल्यवान संपत्ती आहेत. आता तुम्हाला त्यांचे जीवन आणि कल्याणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याचमुळे स्वत:च्या कमांडला युद्धासाठी तयार राहण्यासाठी कुशल, शिस्तप्रिय आणि धैर्यवान बनवा, असे सैन्य उपप्रमुखांनी ओटीए कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हटले आहे.









