पंतप्रधान मोदींचे उद्गार, कारगिलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी
कारगिल / वृत्तसंस्था
भारताची सेना बलवान आहे, मात्र, युद्ध हा आमच्यासाठी नेहमीच शेवटचा पर्याय राहिला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सैनिकांसमामोर बोलताना केले आहे. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे दिवाळीचा पहिला दिवस सीमेचे संरक्षण करणाऱया सैनिकांसह साजरा केला. कोणीही भारताकडे वक्रदृष्टीने पाहिल्यास त्याला धडा शिकविण्याची क्षमता आणि धोरण भारतीय सैन्यदलांकडे आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी सैनिकांचा गौरव केला.
1999 मध्ये याच कारगिलमध्ये भारताच्या शूर सैनिकांनी दहशतवादाची कबर खोदली होती. पाकिस्तानचा दारुण पराभव करून त्याला मागे ढकलले होते. त्यानंतर भारतावर आक्रमण करण्याचे धाडस आजपर्यंत पाकिस्तानला झालेले नाही. कारगिलचे युद्ध मी स्वतः जवळून पाहिले आहे. युद्धात विजय मिळविल्यानंतर मी या स्थानाला भेटही दिली होती. त्यामुळे या युद्धाच्या अनेक स्मृती माझ्या मनात आजही ताज्या आहेत. असे भावोत्कट उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

ती दिवाळी आजही स्मरणात
कारगिल युद्धातील देदिप्यमान विजयानंतर येथे जी दिवाळी साजरी झाली, ती आजही जशीच्या तशी स्मरणात आहे. दहशतवादाचा नायनाट करणाऱया या भूमीत साजऱया झालेल्या त्या दिवाळीने भारताला एक नवे सामर्थ्य मिळवून दिलेले होते. गेल्या आठ वर्षांमध्ये केंद्र सरकारने सैन्यदलांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने अनेक महत्वाची पावले वेगाने उचलली आहेत. सैन्यदलांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. नवे तंत्रज्ञान आणले जात आहे. सीमावर्ती भागांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. तसेच महिलांनाही सैन्यामध्ये येण्याचा मार्ग मोकळा करुन दिला आहे, अशी भलावण त्यांनी केली.
सुधारणांना वेग
अनेक दशकांपासून सेनादलांमध्ये आणि सैन्ययंत्रणेत सुधारणा करण्याची नुसती चर्चा होत होती. तथापि, गेल्या आठ वर्षांमध्ये त्यासाठी ठोस कृती करण्यात आली आहे. आज सर्व निर्णयांचे वेगाने क्रियान्वयन होत आहे. देशाच्या सीमा सुरक्षित असतील तरच देश सुरक्षित राहील. तसेच देशाची अर्थव्यवस्था आणि समाज सुस्थितीत राहतील, हे तत्व गेल्या आठ वर्षांमध्ये खऱया अर्थाने लागू करण्यात आले आहे. भारत आज आपल्या देशांतर्गत आणि बाहय़ शत्रूंच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या स्थितीत आहे. दहशतवाद, नक्षलवाद आणि अतिरेक यांचा बिमोड करण्याचे काम आज जोमाने केले जात आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आत्मनिर्भरता सर्वात महत्वाची
शस्त्रबळनिर्मितीत आत्मनिर्भरता प्राप्त करणे हे आमचे ध्येय आहे. शस्त्रसामग्रीसठीचे विदेशांवरील अवलंबित्व कमीत कमी असावयास हवे, हे धोरण आहे. त्यानुसार देशातच अत्याधुनिक शस्त्रयंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक प्रकारची शस्त्रे, जी 2014 पूर्वी आयात करावी लागत होती, ती, तेव्हढय़ाच गुणवत्तेने आज भारतात बनत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पंतप्रधान मोदींची दिवाळी…
2014 ः सियाचीन हिमनदीच्या दुर्गम प्रदेशात
2015 ः पंजाबमध्ये, तीन विजयस्तंभांच्या स्थानी
2016 ः हिमाचल प्रदेशच्या सीमेवरील सैन्यासह
2017 ः जम्मू-काश्मीरच्या गुरेझमील सैन्यासह
2018 ः उत्तराखंडच्या हरसील सीमेवर सैन्यासह
2019 ः जम्मू-काश्मीरच्या राजौरी सीमाक्षेत्रात
2020 ः लोंगोवाल येथील सीमावर्ती चौकी क्षेत्रात
2021 ः जम्मू-काश्मीरच्या नौशेरा येथे सीमाभागात









