काश्मीरमधील ‘एलओसी’च्या दौऱ्यात जवानांना केले मार्गदर्शन : जवानांमध्ये उत्साह
वृत्तसंस्था/ श्रीनगर
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी शनिवार, 15 जुलै रोजी नियंत्रण रेषेजवळील फॉरवर्ड भागांना भेट देऊन सुरक्षाविषयक सज्जतेचा आढावा घेतला. घुसखोरीविरोधी यंत्रणा आणि नियंत्रण रेषेची सुरक्षा राखण्यासाठी असलेल्या भक्कम स्थितीबाबत उत्तर कमांडचे प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी एलओसी आणि आयबीवरील परिस्थितीबद्दल लष्करप्रमुखांना तपशीलवार माहिती दिली.
जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आलेले लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी फॉरवर्ड भागात तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्या सततच्या सतर्कतेबद्दल आणि उच्च मनोबलाबद्दल त्यांचे कौतुक केले. लष्करप्रमुखांनीही जवानांना त्याच आवेशाने आणि उत्साहाने काम करत राहण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी सीमेवर सुरू असलेल्या ऑपरेशनची तयारी आणि इतर गोष्टींची माहिती घेतली. नियंत्रण रेषेवर जागरुकता ठेवण्यासाठी घुसखोरीविरोधी ग्रिड अधिक मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. सीमेवरील आढाव्यापूर्वी लष्करप्रमुखांनी शुक्रवारी राजभवनात लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची भेट घेतली होती. लष्करप्रमुख आणि एलजी यांच्यात विविध सुरक्षेच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. लष्करप्रमुखांसोबत उत्तरी कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि 15 कॉर्प्सचे जीओसी लेफ्टनंट जनरल राजीव घै उपस्थित होते.









