40 वर्षे जुने युद्ध संपविण्यास तयार कट्टर शत्रू
वृत्तसंस्था/ येरेवान
दक्षिण कॉकेशसचे दोन देश आर्मेनिया आणि अझरबैजान स्वत:चे 4 दशके जुने शत्रुत्व संपुष्टात आणण्यासाठी एका शांतता करारावर सहमत झाले आहेत. आर्मेनिया आणि अझरबैजानच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळे वक्तव्य करत संघर्ष समाप्त करण्यासाठीच्या कराराच्या मसुद्यावर सहमती दर्शविली आहे. सोव्हियत महासंघाचा हिस्सा राहिलेले दोन्ही देश 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून परस्परांशी लढत आहेत. 2023 मध्ये दोही देशांदरम्यान हिंसक संघर्ष सुरू झाला होता, परंतु बदललेल्या स्थितीत हा शांतता करार आशेचा किरण ठरला आहे.
40 वर्षे जुने शत्रुत्व
आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील शत्रुत्वाची सुरुवात 80 च्या दशकाच्या अखेरीस झाली होती. तेव्हा अझरबैजानचे क्षेत्र नागोर्नो-काराबाख आर्मेनियाच्या समर्थनाने अझरबैजानपासून वेगळा झाला होता. अझरबैजानसोबतच्या शांतता कराराच्या मसुद्याला अंतिम रुप देण्यात आल्याची घोषणा आर्मेनियाच्या विदेश मंत्रालयाने केली आहे.
शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास तयार आहोत. आर्मेनिया प्रजासत्ताक करारावर स्वाक्षरी करण्याची तारीख आणि स्थळाबद्दल अझरबैजानसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे आर्मेनियाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात शांतता अन् आंतरराष्ट्रीय संबंधांच्या स्थापनेसंबंधी मसुदा करारावरील चर्चा समाप्त झाल्याचे अझरबैजानच्या विदेश मंत्रालयाने वक्तव्य जारी करत म्हटले आहे.
शांतता कराराच्या मार्गातील अडथळे
परंतु करार होणारच असे आताच ठोसपणे कुणीच सांगू शकत नाही, कारण अझरबैजानने आर्मेनियाच्या घटनेत बदल करण्याची मागणी केली आहे. आर्मेनियाची राज्यघटना आमच्या भूभागावर दावा करत असल्याचे अझरबैजानने म्हणणे आहे. तर आर्मेनियाने हा दावा फेटाळला आहे. परंतु पंतप्रधान निकोल पेशिनयान यांनी देशाच्या संस्थापक दस्तऐवजाला बदलण्याची गरज असल्याचे म्हणत याकरता जनमत चाचणीचे आवाहन केले आहे, पण त्यांनी याकरता कुठलीही तारीख जाहीर केलेली नाही.
अझरबैजानला मिळाले होते यश
1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात दोन्ही देशांच्या शत्रुत्वामुळे आर्मेनियातून हजारो मुस्लीम अजेरी आणि अझरबैजानमधून ख्रिश्चन आर्मेनियन लोकांना सामूहिक स्वरुपात विस्थापित व्हावे लागले होते. तर सप्टेंबर 2023 मध्ये एका सैन्य मोहिमेनंतर अझरबैजानने काराबाखवर पुन्हा नियंत्रण मिळविले हेते. यानंतरच शांतता चर्चा सुरू झाली. या मोहिमेमुळे सुमारे 1 लाख आर्मेनियन वंशाच्या लोकांनी आर्मेनियात धाव घेतली होती. या युद्धानंतर आर्मेनियाने शस्त्रास्त्रांसाठी भारताची मदत घेतली होती. आर्मेनियाने भारताकडून रॉकेट लाँचर, तोफा, रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची खरेदी केली आहे. तर भारतासोबत रणगाडा खरेदीसाठी देखील आर्मेनिया चर्चा करत आहे.









