मुरगुड- निपाणी मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
मुरगूड/ वार्ताहर
विजेच्या कडकडाबरोबर मुरगुड शहरासह परिसराला गुऊवारी सायंकाळी वळीवाने झोडपून काढले. ढगफुटीसदृश्य पावसामुळे बाजारपेठेसह शेतक्रयांची दैना उडाली. शहरात सर्वत्र पाणी पाणी झाले होते. सुमारे तासभर बरसलेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळित झाले व नागरिकांची त्रेदातिरपट उडाली. सध्या सुरू असलेले निपाणी -फोंडा मार्गाचे काम निकृष्ट झाल्यामुळे सर्वच रस्त्यावर फुटभराहून अधिक उंचीने पाणी वाहत होते. काही ठिकाणी गटारी तुंबून रस्त्यावर पाणी आल्याचे चित्र दिसत होते. मुरगुड -निपाणी मार्गावर मुरगुड नाक्याजवळ प्रवेशद्वाराच्या कमानी लगत मोठे झाड रस्त्यावर उन्मळून पडल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. तसेच विजेचा खांब उन्मळून पडल्याने शहराचा विद्युत पुरवठा रात्री उशीरापर्यंत खंडित झाला. पाऊस गेल्यानंतरही विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची लोकांना प्रतीक्षा करावी लागली. तब्बल तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे लग्नसराईच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धांदल उडाली.









