कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कोल्हापुरातील जुन्या राजवाड्याजवळच्या मेन राजाराम हायस्कूल या ऐतिहासिक वास्तूच्या अवस्थेबद्दल ‘तरुण भारत संवाद’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आणि, कोल्हापूरकरांच्या मनात या वास्तूबद्दल दडलेल्या भावनांचेच प्रतिबिंब त्यांच्या प्रतिक्रियातून उमटले. ही वास्तू जतन तर व्हावीच. पण दगडाची वास्तू म्हणून नव्हे तर या वास्तूत कोल्हापूरचा सारा इतिहास जपला जावा. इथली ज्ञानदानाची परंपरा कायम राहावी. ज्यांच्या प्रेरणेतून या वास्तूची उभारणी झाली, त्या राजाराम महाराज (दुसरे) यांची कारकीर्द नव्या पिढीसमोर नव्याने यावी. ही वास्तू ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून पर्यटनाच्या नकाशावर यावी, अशा विविध भावना कोल्हापूरकरांतून उमटल्या. त्यात केवळ इतिहासप्रेमीच नव्हे, तर कोल्हापुरातल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातूनही विविध भावना ‘तरुण भारत संवाद’कडे व्यक्त झाल्या, या भावनांचा हा गोषवारा.

वास्तूचे अंतरंग कोल्हापूरकरांनी आवर्जून पहावेत
राजाराम महाराज दुसरे हे कोल्हापूरचे. ते इटली फ्लॉरेन्समध्ये गेले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. तेथे त्यांची समाधी बांधण्यात आली. सहा लाख युरो खर्च करून इटली सरकारने तेथे एक सुंदर पार्क बनवला व त्याचे जतन केले. आम्ही कोल्हापूरकरांनी राजाराम महाराजांच्या नावाने असलेल्या मेन राजाराम हायस्कूल या वास्तूकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष केले. राजाराम महाराजांची स्मृती तर जपली गेली पाहिजेच. पण मेन राजाराम या वास्तूचे अंतरंग साऱ्या कोल्हापूरकरांनी आवर्जून पाहिले पाहिजे
डॉ. यशवंत थोरात
संयुक्त प्रयत्नांची गरज
राजाराम महाराज दुसरे हे कोल्हापूर संस्थानचे आधुनिकतेची जाण असलेले छत्रपती म्हणून ओळखले जातात. भवानी मंडपालगत मेन राजाराम हायस्कूल म्हणून ओळखली जाणारी दगडी बांधकामाची वास्तू ही त्यांच्या नावाने आहे. किंबहुना त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टीची ते प्रतीक आहे. ही वास्तू तर जपली जावीच. पण राजाराम महाराजांचा इतिहास नव्या पिढीसमोर यावा, यासाठी संयुक्त प्रयत्न व्हावेत.
बाळ पाटणकर, वंशज, राजाराम महाराज दुसरे यांचे मूळ घराणे
समोरची बाग आकर्षक करावी
राजाराम हायस्कूलच्या ओपन थिएटरचा वापर दृकश्राव्य कार्यक्रमासाठी करावा. करवीर रियासतीची माहिती त्यातून सर्वांना व्हावी. केवळ पर्यटकच नव्हे तर, कोल्हापूरकरांनाही त्याची गरज आहे. हायस्कूलसमोरची बाग आकर्षक करावी. तेथे कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमावेत.
अनिलराज जगदाळे
कोल्हापूरचे वैभव म्हणून वास्तू जपावी
ही वास्तू म्हणजे कोल्हापूरचे वैभव आहे. ती आहे तशी जपली जावी. केवळ ही वास्तू देखणी आहे, असे नव्हे. तर ही वास्तू उभी करणारे राजाराम महाराज दुसरे यांचा विचारही पिढीने जपला पाहिजे आणि त्यासाठी तो इतिहास या पिढीसमोर नव्याने आणला गेला पाहिजे.
आर्किटेक्ट शिरीष बेरी
आर्किटेक्टस् अँड इंजिनिअरींग असोशिएशन सहकार्य करणार
वास्तू सुंदर तर आहेच. पण शिक्षणासारख्या कारणासाठी ही वास्तू बांधली गेली आहे. कोल्हापुरातील जुन्या पिढीने तेथे शिकून वैभव अनुभवले आहे. त्या वास्तूचे आता जतन अतिशय काळजीपूर्वक व्हावे. हा ठेवा जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. इंडियन असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूर यासाठी सर्व काही सहकार्य करण्यास तयार आहे.
अजय कोराणे
स्मृती विसरणे हा आपला नतदृष्टपणा
या परिसरातून जाताना या वास्तूबद्दल कोल्हापूरकरांनाही फारसे काही कळत नाही. राजाराम महाराज दुसरे यांची स्मृती आपण विसरणे हा राजाराम महाराजांचा मुळीच अपमान नाही, तो आपला नतद्रष्टपणा आहे.
सुरेश भोसले (निवृत्त डीवायएसपी)
शिक्षणाच्या दूरदृष्टीचे अमुल्य उदाहरण
राजाराम महाराज कोण? त्यांचा इतिहास काय? याची माहिती आपण पहिल्यांदा कोल्हापूरकरांना व नंतर पर्यटकांना करून देण्याची गरज आहे. एक राजा शिक्षणाच्या बाबतीत किती दूरदृष्टीचा होता, याचे अमूल्य उदाहरण म्हणजे ही वास्तू आहे.
भगवान चिले
शालेय विद्यार्थ्यांना वास्तूचे दर्शन घडावे
या वास्तूचे शालेय विद्यार्थ्यांना दर्शन घडावे म्हणून कोल्हापुरातल्या शाळांतील सहली या ठिकाणी काढाव्यात. जेणेकरून राजप्रसादात बसून सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, यासाठी धडपडणारे राजाराम महाराज किती थोर होते. हे नव्या पिढीला तरी कळेल.
सुधाकर सावंत
दगडी बांधकामातील अद्वितीय वास्तू
कोल्हापुरातल्या अनेक वास्तू तत्कालीन इतिहासाच्या साक्षीदार आहेत. मेन राजाराम हायस्कूल ही वास्तू दगडी बांधकाम प्रकारातील एक अद्वितीय अशी वास्तू आहे.
आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर
वास्तूरचनेवर अभ्यास व्हावा
या वास्तूतून ज्ञानप्रसाराचे काम सुरू आहे, ते तसेच पुढे चालावे. आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या वास्तूच्या रचनेवर अभ्यास करावा. छायाचित्रकारांनीही वेगवेगळ्dया अँगलमध्ये छायाचित्रे घ्यावीत व शुभेच्छाकार्ड स्वरूपात वितरित करावीत. या वास्तूचे नूतनीकरण न करता ती आहे तशीच जपावी.
डॉ. बी .एम. हिर्डेकर
वास्तूसह सारा इतिहास नव्या पिढीसमोर यावा
कोल्हापूरचा दैदीप्यमान इतिहास अशा अनेक जुन्या वास्तूंत दडला आहे. मेन राजाराम हायस्कूलच्या निमित्ताने या विषयाला तोंड फुटले आहे. केवळ ही वास्तूच नव्हे तर, कोल्हापूरचा सारा इतिहास नव्या पिढीसमोर एकत्रित यावा.
फिरोज शेख
वास्तूमध्ये आर्ट स्कूल सुरू करावे
या वास्तूच्या एका भागात आर्ट स्कूल सुरू करावे. आर्ट स्कूलसाठी याहून दुसरी योग्य जागा नाही. या ठिकाणी पार्किंगची टुम कोणीतरी काढली आहे. त्यामुळे बघता बघता या वास्तूची वाट लागेल.
अस्मिता पोतदार
1857 चा दडलेला इतिहास नव्या पिढीसमोर यावा
1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास याच वास्तूच्या परिसरात दडला आहे. तो सारा इतिहास नव्या पिढीसमोर यावा आणि तो इतिहास वेगवेगळ्dया माध्यमातून नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी मेन राजाराम हायस्कूलचाच परिसर अतिशय योग्य आहे. त्यानिमित्ताने केवळ लोकांना ही वास्तू पाहण्यास मिळेल असे नव्हे, तर त्या निमित्ताने सारा इतिहास नव्या पिढीसमोर येईल.
शाहीर राजू राऊत








