प्रतिनिधी/ बेळगाव
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या तपासनाक्यांवर बेकायदा दारूसाठा जप्त करण्याचा सपाटा सुरूच आहे. घटप्रभा, पट्टणकुडी, खणगाव-शिलतीभावी रोडवर बेकायदा दारू जप्त करण्यात आली आहे.
अबकारी विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि. 1 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजता दुचाकीवरून बेकायदा दारू वाहतूक करताना 17 लिटर 280 मिली बेकायदा दारूसाठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी रात्री 10 वाजता गोकाक तालुक्यातील खणगाव-शिलतीभावी रोडवर दुचाकीवरून बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन 17 लिटर 280 मिली दारू जप्त करण्यात आली आहे. त्याची किंमत 57 हजार 745 रुपये इतकी आहे. आरोपीला नोटीस देण्यात आली असून दुचाकी मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
चिकोडी तालुक्यातील पट्टणकुडी येथे 17 लिटर 280 मिली बेकायदा दारू जप्त करण्यात आली आहे. दुचाकीवरून या दारुची वाहतूक करण्यात येत होती. प्रकाश हेगडे (रा. चिखलव्हाळ) याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे अबकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या तपासनाक्यांवर तपासणी वाढविण्यात आली आहे.









