वार्ताहर /शिवोली
हडफडे येथील श्री चौरंगीनाथ भूमिका पंचायतन ग्रामदेवस्थानचा 84 वा वर्धापनदिन सोहळा थाटात साजरा झाला. या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पंचायतन देवतांची पूजा, भाविकांतर्फे अभिषेक, एकादशणी इत्यादी धार्मिक देवकृत्ये झाली नंतर लघुऊद्र व श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. वार्षिक पूजेचे यजमान श्री. व सौ. इंदिरा येतू पोळ यांनी भूषविले. दुपारी श्री चौरंगीनाथ भूमिका भजनी मंडळतर्फे भजनाचा कार्यक्रम झाला. तद्नंतर पंचायतन देवतांना महानैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नंतर ग्रामदेवी श्री भूमिका मातेची पालखीतून मंदिराला प्रदक्षिणा सोबत सुवासिनींकडून जोडव्यांचा कार्यक्रम झाला. नंतर फळफळावळींच्या पावणी तीर्थप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.









