दिवसात 22 तास घेत असतो झोप
माणसाने तंदुरुस्त राहण्यासाठी कमीतकमी 6 तासांची झोप घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे मानणे आहे. परंतु याहून कमी काळ झोपत असल्यास तुमच्या प्रकृतीवर याचा प्रभाव हा पडणार आणि तुम्ही आजारी व्हाल. लोकांना झोपेचे महत्त्व समजाविणे आणि स्वस्थ झोप न घेण्याचे दुष्प्रभाव समजाविण्यासाठी दरवर्षी स्लीप डे देखील आयोजित केला जातो. परंतु जगातील एक प्राणी स्वत:च्या आयुष्यातील बहुतांश वेळ झोपेत घालवित असतो.
कोआला हा शाकाहारी प्राणी असून तो जंगलांमध्ये आढळतो. कोआला झाडांवर आढळून येतो आणि हा केवळ ऑस्ट्रेलियातच दिसून येतो. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व हिस्स्यात यूकेलिप्टसचे जंगल असून तेथे हा प्राणी आढळून येतो. कोआलाचा मुख्य आहार यूकेलिप्टसची पानं असतात आणि तो एका दिवसात एक किलोग्रॅमपर्यंतच्या वजनाची पानं फस्त करत असतो. या प्राण्याला नो ड्रिंक नावाने देखील ओळखले जाते, कारण हा दिवसात फारच कमी पाणी पित असतो.
किती वेळ झोप
कोआला दिवसाच्या 24 तासांपैकी 22 तास झोपतो आणि शरीरातील पाण्याची कमतरता यूकेलिप्टसच्या पानांद्वारे दूर करतो. याला जगातील सर्वाधिक झोपणारा प्राणी असेही म्हटले जाते. याची गणना जगातील सर्वात आळशी प्राण्यांमध्ये केली जाते. पानांपासून मिळणारी कमी ऊर्जा पचविणे आणि ती कायम राखण्यासाठी या प्राण्याला इतका अधिक वेळ झोपून राहण्याची गरज भासते. हा प्राणी एकांतप्रिय असतो आणि दिवसातील बहुतांश वेळ झोपण्यात किंवा खाण्यात घालवत असतो.
आयुर्मान
कोआला एक मार्सुपियल आहे, म्हणजेच याची पिल्लं जन्माच्यावेळी पूर्णपणे विकसित नसतात. कोआलाच्या पिल्लाला जोई म्हटले जाते. याची पिल्लं जन्माच्या 6-7 महिन्यांपर्यंत आईच्या शरीरावरील पिशवीत राहतात. यानंतर स्वत:च्या आईच्या पाठीवर चढून ती एक वर्षभरापर्यंत हिंडत असतात. नर कोआलाचे सरासरी आयुर्मान 12 तर मादीचे आयुर्मान 15 वर्षांपर्यंत असते.









