महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
आणखी एका आठवड्यात गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेळगाव येथील गृह कार्यालयात बोलताना त्या म्हणाल्या, तालुका पंचायतीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते अपघातामुळे विश्रांतीवर असल्याने पैसे जमा होण्यास थोडा विलंब झाला आहे. अधिकाऱ्यांना यापूर्वीच आदेश देण्यात आला असून लवकरच पैसे खात्यावर जमा केले जातील. आतापर्यंत बेंगळूर येथील मध्यवर्ती कार्यालयामार्फत पैसे दिले जात होते. याचे विकेंद्रीकरण करण्यासाठी तालुका पंचायतीमार्फत निधी मंजूर करण्यात येत आहे. त्यानंतर हा निधी महिला-बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या (सीडीपीओ) खात्यात वर्ग केला जात आहे. आणखी एका आठवड्यात पैसे खात्यावर जमा करण्याची सूचना केली आहे, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. विरोधी पक्षातील नेत्यांना आरोप, टीका केल्याशिवाय जमत नाही. गॅरंटी योजनांमुळे राज्य सरकार दिवाळखोरीत निघणार असल्याचा दावा करत इतर राज्यांत आमच्या योजनांची कॉपी करून भाजप सत्तेवर आले आहे, अशी टीकाही मंत्री हेब्बाळकर यांनी केली.









