भारतात प्रत्येक जुन्या गावाला त्याचा स्वत:चा एक इतिहास आणि परंपरा आहे. अनेक गावांना अशा परंपरांचा वारसा मिळालेला आहे की त्याची माहिती ऐकून आपल्याला आश्चर्य वाटते. अशाच प्रकारचे एक ऐतिहासिक गाव उत्तर प्रदेश या राज्यात आहे. ते ‘खुन्ना का ताल’ या नावाने ओळखले जाते. या गावाची परंपरा आपल्या अंगावर काटा उभा करेल अशी होती. होती असे म्हणण्याचे कारण असे, की आता या गावाने पूर्णत: कात टाकली आहे. या गावाची परंपरा आणि नंतर या गावाने केलेल्या त्या परंपरेचा त्याग, हे स्थित्यंतर अत्यंत उद्बोधक आहे.
आजपासून केवळ 20 वर्षांपूर्वी या गावाची स्थिती आत्तापेक्षा अगदी वेगळी होती. हे गाव व्यसनी आणि चैनी लोकांचे म्हणून ओळखले जात होते. ते उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातले आहे. या गावातील लोकांनी अनेक पिढ्यांपर्यंत केवळ नाण-गाणी, नौटंकी, तमाशे, मुशायरा आदी पाहण्यात आणि करण्यातच आनंद मानला होता. खाना, पीना और ऐश करना हेच या लोकांचे ध्येय होते. जगात अन्य काही करण्यासारखे आहे, असे त्यांना वाटत नव्हते, असे या गावासंबंधी आज बोलले जाते. याचा अर्थ या गावातले लोक काम करत नसत, असा नाही. पण काम करुन जी कमाई केली जाई, ती अशा प्रकारे मौजमजेत उधळून टाकणे ही या गावाची रीत होती. त्यामुळे पंचक्रोशीत ते कुख्यात होते. तथापि, एखादी जादूची कांडी फिरावी अशी आज या गावाची स्थिती परिवर्तीत झाली आहे.
आज हे गाव सर्वात जास्त ‘सुशिक्षित’ आणि सभ्य म्हणून ज्ञात आहे. येथील जवळपास प्रत्येक घरातली किमान एक व्यक्ती उच्चशिक्षित आहे. अनेकांना प्रशासनात उच्च पदांवर नोकरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे. बदलत्या काळाप्रमाणे आपल्याला बदलावेच लागते तथापि, या गावाचा परिवर्तनाचा वेग थक्क करणारा आहे. ही जणू एक क्रांतीच आहे. या गावात असे परिवर्तन घडले आहे, यावर पंचक्रोशीतील अनेकांचा विश्वासही बसत नाही. आज या गावातील बव्हंशी पुरुष आणि स्त्रिया शिक्षण, राजस्व विभाग, पोलीस विभाग आदी विभागांमध्ये मध्यम ते उच्च पदांवर नोकरी करीत आहेत. आता या गावात घुंगरांचे ध्वनी ऐकू येत नाहीत. हे परिवर्तन अविश्वसनीय आहे, असे अनेकजण उघडपणे बोलतात.









