कुंभारजुवे मतदारसंघातील सरपंचांकडून प्रत्युत्तर, आमदार राजेश फळदेसाई यांच्यावरील आरोप खपवून घेणार नसल्याचा इशारा
पणजी : सामाजिक कार्यकर्ते अॅन्थनी डिसील्वा यांनी कुंभारजुवे मतदारसंघाचे आमदार राजेश फळदेसाई यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असून, हे आरोप पूर्णपणे चुकीचे व तथ्यहिन आहेत. यापुढे असे आरोप खपवून घेणार नसल्याचा इशारा कुंभारजुवे मतदारसंघातील बहुतांश पंचायतीच्या सरपंचांनी दिला. पणजी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला खोर्ली पंचायतीचे सरपंच बाप्तिस्त परैरा, करमळी पंचायतीचे सरपंच कुष्टा सालेलकर, जुने गोवा पंचायतीचे उपसरपंच विश्वास कुट्टीकर, कुंभारजुवेचे सरपंच नंदकुमार शेट, सांत इस्तेव्हच्या सरपंच स्मीता सावंत, सावमातियासच्या सरपंच सुप्रिया तारी, जुने गोवे पंचायतीचे पंच अमर आमोणकर याशिवाय विल्सन वालादारीस, जॉन बोर्गेज, बाबू मुरगावकर, प्रशांत जोशी उपस्थित होते.
खोर्ली पंचायतीचे सरपंच बाप्तिस्त परैरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अॅन्थनी डिसील्वा यांनी व्हिडियोद्वारे कुंभारजुवा मतदारसंघात आमदार फळदेसाई हे काहीच काम करीत नसल्याचा दावा करीत आहेत. शिवाय हल्लीच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात आमदार फळदेसाई यांनी केलेल्या भाषणाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. परंतु डिसील्वा यांनी असे व्हिडिओ व्हायरल करण्यापूर्वी पूर्णपणे त्याची पार्श्वभूमी आणि उद्देश हे तपासणे गरजेचे होते. त्यांनी केलेले प्रसारित केलेले व्हिडिओवरून डिसील्वा यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, असा आरोपही परैरा यांनी केला. जुने गोवे येथील एका बंगल्याच्या बेकायदा बांधकामाचा प्रश्न आणि हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. तरीही डिसिल्वा यांनी हा प्रश्न उपस्थित करून आपलेच हसे करून घेतले असल्याचा दावा उपस्थित सरपंचांनी केला. त्यामुळे यापुढे राजेश फळदेसाई यांच्यावर आरोप केल्यास तो खपवून घेणार नसल्याचे सरपंचांनी सांगितले. चुकीची माहिती देणारा व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे डिसिल्वा यांच्याविऊद्ध जुने गोवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही सरपंच परैरा म्हणाले.
…तर इतकी वर्षे का बोलला नाहीत?
अॅन्थनी डिसिल्वा यांनी आमदार फळदेसाई यांच्यावर आरोप करताना दहावेळा विचार करायला हवा होता. कारण ते सध्या सरकारात सहभागी होऊन केवळ दीड वर्षे झालेले आहेत. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात किती विकास केला आणि कोणता केला, याविषयी त्यांनी गत आमदारांना विचारायला हवे होते, त्यावेळी हे डिसिल्वा का बोलले नाहीत? असा प्रश्नही सरपंचांनी उपस्थित केला. जुने गोवे येथील बेकायदा बांधकामासंबंधीचा प्रश्नही सध्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर आमदार बोलणे योग्य नसल्याचे म्हणणे सरपंचांनी मांडले. डिसिल्वा यांना आमदार सरदेसाई यांच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे ते म्हणाले.









