आयोजकांकडून जय्यत तयारी, रोमटामेळ पथकांच्या दिरंगाईमुळे चित्ररथ पथकांना प्रथम संधी
प्रतिनिधी/ पणजी
राज्याचा प्रमुख उत्सवांपैकी एक असलेल्या शिमगोत्सवाला राजधानी पणजीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजधानीत ‘ओस्सय ओस्सय’, ‘घुमचे कटर घुम’चा निनाद घुमला. ढोलताशे आणि कासाळ्याच्या एकत्रित वादनाने निर्माण झालेल्या ‘घुमचे कटर घुम’च्या निनादाने पणजी शहर भारावून गेले.
गोवा सरकारचे पर्यटन खाते व पणजी शिमगोत्सव समितीतर्फे शनिवारी शिमगोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. जुन्या सचिवालयासमोरून शिमगोत्सव मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर मुख्यमंत्री सावंत व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, महापौर रोहित मोन्सेरात, पणजी शिमगोत्सव समितीचे उपाध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम नाईक आदी उपस्थित होते.
राज्याची लोकसंस्कृती, लोकपरंपरा यांचे प्रतिबिंब जनमानसापर्यंत पोहचविण्याऱ्या तसेच सांस्कृतिक परंपरा असलेल्या शिमगोत्सवातील चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य पथकांनी आपल्या कलेचे दर्शन घडवले. वेशभूषा आणि चित्ररथ स्पर्धकांनीही उपस्थितांकडून वाहवा मिळवली. विशेष म्हणजे वेशभूषा स्पर्धेत लहान मुलांनी भाग घेऊन उपस्थितांचे लक्ष्य वेधले. पणजी शिमगोत्सव समितीने निटनेटके आयोजन करून शहरात शिमगोत्सवापूर्वीच वातावरण निर्मिती केली होती. दिवजा सर्कल ते कांपाल या मुख्य रस्त्याच्या बाजूला आकर्षक सजावट केली होती.
गोव्याचा सांस्कृतिक उत्सव म्हणून शिमगोत्सव साजरा केला होता. गोव्याच्या शिमगोत्सवाची ओळख सातासमुद्रापार असल्याने या उत्सवात उत्तमप्रकारे सादरीकरण व्हावे, यासाठी प्रत्येक पथक व कलाकार आपल्या कलेचे दर्शन उत्कृष्टपणे घडवतात. पणजीतील शिमगोत्सवातील मिरवणूक पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबरच पर्यटकांनीही गर्दी केली होती.
चित्ररथांना मिळाली संधी…
पणजी शिमगोत्सव समितीने वेळेचे बंधन पाळण्यासाठी शिमगोत्सवाची तयारी जय्यत व वेळेत केली होती. परंतु रोमटामेळ पथकांचे सादरीकरण अगदी कासवगतीने सुरू होणार याची कल्पना येताच चित्ररथ मिरवणुकीला प्रथम प्राधान्य देण्यात आली. साडेपाच वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत रोमटामेळ, चित्ररथ मिरवणुकीचे सादरीकरण सुरू होते. लोकांची शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
पोलिसांकडून चोख व्यवस्था
पणजी शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदा 18 जून रस्त्याऐवजी शहरातील मुख्य रस्त्यावर शिमगोत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील अंतर्गत भागात वाहतूक वळविण्यात आली होती. ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकरवी वाहतुकीचे नियोजन करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली नाही.
सहभागी स्पर्धक असे :
यंदाच्या पणजी शिमगोत्सव मिरवणुकीला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यामध्ये रोमटामेळची 17 पथके सहभागी झाली होती. त्याचप्रमाणे चित्ररथ 11 पथके, लोकनृत्य पथक 13 यांनी भाग घेतला होता. तर वैयक्तिक सादरीकरणामध्ये वरिष्ठ गटात 23 वेशभूषा स्पर्धक तर कनिष्ठ गटात सुमारे 56 वेशभूषा स्पर्धकांनी भाग घेतला. होता. मुलांची विविध प्रकारची वेशभूषा केल्याने नागरिकांचे त्यांनी लक्ष्य वेधून घेतले









