लक्ष्मी हेब्बाळकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : मलप्रभा साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन करणे आमचे उद्दिष्ट आहे. कारखान्याच्या विकासासाठी आपले संपूर्ण सहकार्य असेल, असे आश्वासन महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले. सोमवार दि. 29 रोजी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. निवडणूक म्हणजे चुरस ही असतेच. विजय-पराजय असतोच. मात्र पराजयाने खजिल होऊ नये व विजयाने हुरळून जाऊ नये. कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आदींच्या नेतृत्वातील पॅनेलने मलप्रभा साखर कारखान्याच्या निवडणुकीत भरघोस यश संपादन केले. कारखान्याच्या विकासासाठी आमचे पॅनेल अहोरात्र परिश्रम घेईल, असे त्या म्हणाल्या. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने कर्जबाजारी आहेत. 220 कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज भागवण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आमचे प्रयत्न राहतील. अध्यक्षांची लवकरच निवड करण्यात येईल. चन्नराज हट्टीहोळी मागील पंधरा वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. यापुढील दिवसातही ते सहकार क्षेत्रातच कार्यरत राहतील, असेही त्या म्हणाल्या.
शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य : हट्टीहोळी
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले, हा विजय आमचा नव्हेतर शेतकऱ्यांचा आहे. तसेच भागधारकांचे सहकार्य आम्हाला मिळाले आहे. कारखान्याचे कामकाज सुरळीत चालवणे आमची जबाबदारी आहे. कारखान्यात लहान व प्रगतशील शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. व्यवस्थापन चालविण्याचा अनुभव आपणाला आहे. मागील सहा-सात वर्षांपासून कारखान्याचे व्यवस्थापन पाहात आहोत. जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे मलप्रभा कारखान्यासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना दहा ते पंधरा दिवसांत बिल देण्याची व्यवस्था करू. सर्वांना विश्वासात घेऊनच कार्य करू. पॅनेलच्या मार्गदर्शनानुसारच कार्य चालवू. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देण्याची व्यवस्थाही करू, असे हट्टीहोळी म्हणाले.









