रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इन्टेलिजन्स क्षेत्रातील प्रगती याच वेगाने सुरू राहिली, तर तंत्रज्ञान मानवावर नियंत्रण मिळवू शकेल, अशी भीती विशिष्ट शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, तंत्रज्ञान मानवानेच तयार केले असल्यामुळे ते त्याच्या हुकुमाबाहेर जाणे शक्य नाही, असे सांगणारा शास्त्रज्ञांचा एक गट आहे. कोणतेही नवे तंत्रज्ञान उदयास आले की त्याविषयी आधी भीती व्यक्त केली जाते. भारतात संगणकीकरणाचे युग आले तेव्हाही संगणकामुळे प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढेल अशी हाकाटी पिटण्यात आली होती पण आज याच संगणक, इंटरनेटमुळे आणि माहिती-तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलल्याचे आणि मानवी जीवन सुकर व सुखकर बनल्याचे दिसत आहे. तशाच प्रकारे ‘एआय’चे संभाव्य व वास्तवातील धोके मान्य केले तरी यामुळे होणारे क्रांतिकारी बदल दुर्लक्षिता येणार नाहीत.
‘एआय’ म्हणजे काय, हे सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास आपल्या आपण शिक्षण घेणारे यंत्र होय. एक असे यंत्र किंवा संगणक, ज्याला स्वत:चा मेंदू आहे आणि हा संगणक आपल्या आसपासच्या लोकांचे व्यवहार पाहून स्वत: शिकतो. 1950 च्या दशकात आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स या तंत्रज्ञानाने सर्वप्रथम तंत्रज्ञानावर प्रभाव पाडायला सुरुवात केली होती. गेल्या दहा वर्षांच्या काळात या तंत्रज्ञानाचा विकास कुठच्या कुठे पोहोचला आहे.
ऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार प्राणिप्रजातींपैकी एकट्या मानवाने निसर्गाला आव्हान दिले. स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व बनवून विज्ञानाच्या आधारे प्रगती साधली. शारीरिक आणि बौद्धिक कष्ट कमी करण्यासाठी तंत्रज्ञान जन्माला घातले. संपूर्ण पृथ्वीतलावर मानवाला आव्हान देऊ शकेल अशी कोणतीही प्राणिप्रजाती नाही. परंतु याचा अर्थ मानवाला कधीच, कुणाकडूनच आव्हान मिळणार नाही, असा घेता कामा नये. मानवानेच जन्माला घातलेले तंत्रज्ञान त्याला आव्हान देऊ शकते, असे विज्ञानाच्या क्षेत्रात बोलले जात आहे.
देशातील आयटी क्षेत्र आज रोजगाराबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावत आहे. तोच प्रकार एआयबाबत होताना दिसत आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे काही दुष्परिणाम किंवा धोके निश्चितच आहेत पण अंतिमत: ते होऊ द्यायचे की नाही हे मानवाच्या हाती आहे, हेही नाकारता येणार नाही. कोणतेही तंत्रज्ञान हे दुधारी अस्रासारखे असते. तेव्हा त्याच्या धोक्यांबाबत सजग राहतानाच त्याचा सकारात्मक वापर अधिकाधिक कसा करता येईल यासंदर्भातील विचारमंथन व्हायला हवे.
एक साधे उदाहरण पहा. घटना आहे 2023 मधील. उत्तर प्रदेश पोलिसांनी स्पर्धा परीक्षांमध्ये फसवणूक करणाऱ्या 87 संशयितांना पकडण्यात यश मिळवले. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने चालणाऱ्या फेस डिटेक्शन सॉफ्टवेअरची मदत मोलाची ठरली. अशी अनेक उदाहरणे आज भवतालात घडत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने, डेटा पॅटर्न तपशीलवार समजून घेऊन, भविष्यातील घडामोडींचा चांगला अंदाज लावला जाऊ शकतो. येणाऱ्या काळात ‘एआय’ मुळे अवकाश संशोधनाचे जग पूर्णपणे बदलून जाईल. भविष्यात स्वायत्त (ऑटोनॉमस) अवकाशयान असतील, जी अवकाशातील बदलत्या परिस्थितीनुसार स्वत:ला अनुकूल करण्यास सक्षम असतील.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स चित्रीकरण आणि ग्राफिक डिझायनिंगच्या जगात मोठे बदल घडवून आणत असून येणाऱ्या काळात उत्पादन नियोजन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी (सीजेआय) या क्षेत्रात मोठी क्रांती झालेली पाहायला मिळणार आहे. याशिवाय इंटरनेट ऑफ थिंग्जच्या इकोसिस्टममध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा मोठा वापर होणार आहे.
वाहन क्षेत्रात हे तंत्रज्ञान आल्यानंतर मोठी क्रांती होणार आहे. नजीकच्या भविष्यात, बिग डेटा पॅटर्नवर आधारित सेल्फ-ड्रायव्हिंग कार मानवांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे रस्त्यावर चालवण्यास सक्षम असतील, असा दावा केला जात आहे. यामुळे रस्ते अपघात कमी करण्यात यश येईल असे मानले जाते. अर्थातच याबाबत अजून बरेच संशोधन आणि पाहणी होणे बाकी आहे पण काही देशांत या कारच्या चाचण्यांचे परिणाम सकारात्मक आल्याची माहिती पुढे आली आहे. वैज्ञानिक शोध आणि नवीन औषधांच्या निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा मैलाचा दगड ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आरोग्य सेवा क्षेत्रातील पारंपारिक प्रणाली पूर्णपणे बदलेल. एआयच्या मदतीने आजारांच्या अचूक निदानाला चालना मिळणार असून उपचारप्रक्रियेतही एआयची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या चाळीस वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात रोबोच्या साह्याने अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. आता रोबो या क्षेत्रात विश्वासास पात्र ठरला असून, सूक्ष्म आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया तो उत्तम रीतीने पार पाडू शकतो. आज भारतात रोबोटिकनी रिप्लेसमेंट सर्जरीचे वाढते प्रस्थ याची साक्ष देणारे आहे. अगदी अलीकडेच तळेगाव दाभाडे येथील एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग असणाऱ्या रुग्णाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी वापरून बरे करण्यात यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यातील ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. ही उपचार पद्धती आजारी व्यक्तीला वरदान ठरत असून त्याचा फायदा नक्कीच कर्करोगींना मिळताना दिसून येणार आहे.
एआयद्वारे संचलित होणारे चॅटबॉट्स आज सोशल मीडियामध्ये कार्यरत आहेतच. चॅटबॉट्स आणि चॅटजीपीटी, गुगल बार्डसारखी व्हर्च्युअल असिस्टंट टूल्स अनेक समस्या सोडवण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत.
सायबर दुनियेत एआय तंत्रज्ञानावर सर्वाधिक गुंतवणूक करणारी कंपनी झुकेरबर्ग यांची फेसबुक हीच आहे. त्यांच्या मते, विवेकनिष्ठ व्यक्तीने स्वत:ला चौकटीत जखडून घेऊन या तंत्रज्ञानाला विरोध करता कामा नये. फेसबुकचा वापर करणाऱ्यांना हव्या त्याच जाहिराती पाहण्याची मोकळीक या तंत्रज्ञानामुळेच मिळाली आहे. आर्टिफिशियल इन्टेलिजन्समुळे प्रलयाचा दिवस जवळ आला आहे, असे म्हणणाऱ्यांची झुकेरबर्ग कीव करतात. अशी मंडळी नकारात्मक विचारसरणीची आहेत, असा त्यांचा दावा आहे. एआयचा अविवेकी वापर रोखण्यासाठी आतापासूनच कायदे करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन त्यासंदर्भात बहुराष्ट्रीय बैठकांचे आयोजन केले जात आहे.
वैद्यकीय, शिक्षण, दूरसंचार आदी अनेक क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रवेश झालाही आहे. आजही स्वत: शिकणारे रोबो अनेक कामे करीत आहेत. पुढील वीस वर्षांत तर ही वाटचाल अधिक गतिमान होईल आणि जग एका नव्याच युगात प्रवेश करेल. ‘आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स: अ मॉडर्न अॅप्रोच’ या दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकात स्टुअर्ट रसेल आणि पीटर नोर्विग यांनी असे म्हटले आहे की, वीस वर्षांनंतर दुनिया पूर्णपणे बदलून गेलेली असेल. या दुनियेचे मोहमयी वर्णन या पुस्तकात करण्यात आले आहे. या दोन्ही लेखकांनी असे म्हटले आहे की, यंत्रांचा मेंदू इतक्या गतीने काम करू लागेल, याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यांना अशी आशा वाटते की 2035 पर्यंत जे बदल अपेक्षित होते ते आधीच घडून येतील. म्हणजेच, तांत्रिक समृद्धी आणखी वेगाने विस्तारेल आणि मानवी जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. ‘एआय’ हाच या बदलांचा आधार असणार आहे. अनेक क्षेत्रे या तंत्रज्ञानामुळे अंतर्बाह्य बदलून जाणार आहेत. परंतु हे तंत्रज्ञान सध्या अगदीच मूठभर लोकांच्या हातात आहे. येत्या दहा वर्षांत रोबो हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटक बनेल, असे सांगण्यात येते.
आज भारतातील अनेक शाळांच्या वर्गांमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. देशातील सर्वांत साक्षर राज्य असणाऱ्या केरळमध्ये देशातील पहिली रोबो टीचर कार्यान्वित झाली आहे.
कृषी हे असे क्षेत्र आहे, जिथे तंत्रज्ञान सर्वांत उशिरा पोहोचते. विशेषत: विकसनशील देशांमध्ये ते फारच उशिरा पोहोचते. परंतु आज कृषीक्षेत्रात एआयच्या वापराचे प्रमाण वाढत असून याबाबतचे संशोधन अत्यंत वेगवान सुरू आहे. मातीचा प्रकार आणि हवामानाची अनुकूलता अशा सूक्ष्म गोष्टी आत्मसात करून माहिती देणाऱ्या रोबोंचा अवतार झालेला आहे. मातीच्या छायाचित्रातील रंग किंवा संवेदकांकडून मिळालेल्या माहितीवरून मातीचे प्रकार, त्याचे गुणधर्म, त्यातील मूलद्रव्यांचे- खनिजांचे प्रमाण ओळखणे, त्यानुसार शेतकऱ्याला खतमात्रा किंवा सुधारणे संदर्भात आवश्यक त्या सूचना देणे हे काम एआयमुळे शक्य होणार आहे. परदेशातच नव्हे तर भारतातही संपूर्ण स्वयंचलित अशा चालकरहित ट्रॅक्टर, काढणी यंत्रे यांच्या चाचण्या काही कंपन्यांकडून सुरू झाल्या आहेत. कीड व रोग नियंत्रणाबाबत जर्मन तंत्रज्ञानावर आधारित प्लँटिक्स नावाचे अॅप विकसित केले असून, त्यामुळे प्रतिमा ओळख आधारित तंत्रज्ञानाद्वारे कीड व रोगाची ओळख, लक्षणे आणि नियंत्रणाचे उपाय सुचवते. कृषी रोबोटिक्समार्फत शेतीतील तण नियंत्रण, पीकसंरक्षण, कापणी, शेतमाल प्रतवारी, प्रक्रिया आदी कामे अचूकपणे, वेगात करू शकतात. ड्रोनच्या मदतीने पीक परिस्थितीच्या प्रतिमांद्वारे मशीन लर्निंग अल्गोरिदम तंत्रज्ञानाच्या आधारे पोषण व्यवस्थापन, कीडरोग नियंत्रण, हवामान अंदाज याबाबत माहिती मिळू शकते. ड्रोनद्वारे कमी खर्चात, कमी वेळेत, कमी श्रमांत अधिक क्षेत्रावर औषध फवारणी करता येते. आज भारतात अनेक ठिकाणी याचा वापर होत आहे.
पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही एआयचा वापर वरदान ठरत आहे. ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनिअर्स’ आणि ‘ईव्हाय ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर लीड’ने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालातून म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेआधारे पायाभूत सुविधा क्षेत्रात परिवर्तन करण्याची क्षमता कशी आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. एकंदरीत ‘एआय‘पासून असणाऱ्या-दिसणाऱ्या सर्व संभाव्य आणि वास्तववादी धोक्यांचा विचार करता असे म्हणता येईल की, विवेकाने स्वीकारल्यास हे तंत्रज्ञान आपल्याला नक्कीच उपयोगी येईल.
– महेश कोळी








