सफाई कर्मचाऱयांचा इशारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
प्रतिनिधी /बेळगाव
सफाई कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने केली. जोपर्यंत आम्हाला कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेतले जात नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे शहरातील कचरा तसाच पडून होता. या कर्मचाऱयांची महापालिकेच्या अधिकाऱयांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही संपूर्ण राज्यभरच हे आंदोलन करत असून सरकारने आम्हाला कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेतल्यासच आंदोलन मागे घेऊ, असे त्यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता कर्मचारी म्हणून आम्ही काम करत आहे. पहाटे उठून शहरातील कचरा गोळा करून डेपोमध्ये पाठविण्याचे काम करतो. मात्र आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याबाबत अनेकवेळा सरकारकडे निवेदने दिली, आंदोलनेही केली. मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा दिला आहे.
शहराच्या दक्षिण आणि उत्तर भागातील स्वच्छता कर्मचाऱयांनी हे आंदोलन केले. सफाई कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱयांबरोबरच कचरा वाहतूक करणाऱया वाहनचालकांनीही आंदोलनामध्ये भाग घेतला होता.
मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील साहाय्यक अधिकारी निवेदन घेण्यासाठी आले होते. जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वतः येऊन निवेदन स्वीकारत नाहीत; तोपर्यंत आम्ही निवेदन देणार नाही, असा पवित्राही घेतला आहे.
पावसात थांबून निदर्शने
शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. मात्र आंदोलनकर्त्यांनी पावसातच ठाण मांडून बसण्याचा निर्णय घेतला. सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारीही पावसात उभे होते. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी ईश्वर उळागड्डी यांनी त्या कर्मचाऱयांना पाऊस आला आहे; तेव्हा भुयारी मार्गाजवळ किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील एका आडोशाला उभे रहा, असे आवाहन केले. मात्र कर्मचाऱयांनी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही, असे सांगत आंदोलन सुरूच ठेवले.
यावेळी आमदार अनिल बेनके यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. भरपावसामध्ये सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक वाघेला, विजय निरगट्टी, षण्मुख आदीआंद्र, मालती सक्सेना, बळ्ळारी, मुनीस्वामी भंडारी यांच्यासह इतर पदाधिकारी आणि स्वच्छता कर्मचारी थांबून होते.









