आमदार राजू सेठ यांच्यासह नगरसेवकांनी घेतली भेट
बेळगाव : महानगरपालिकेमध्ये चालक, सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र ही नियुक्ती नियमबाह्य असल्याचे कारण पुढे करून 138 कर्मचाऱ्यांची कोंडी करण्यात आली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून त्यांचे वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. गुरुवारी या आंदोलनाला सुरुवात करण्यात आल्यानंतर शुक्रवारीही हे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले होते. शुक्रवारी आंदोलनस्थळी आमदार राजू सेठ यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व यावर निश्चितच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांनी आम्ही गुरुवारपासून आंदोलन करत आहोत. मात्र आमच्या या समस्येकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप केला. आम्हाला सहा महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे तातडीने आमची समस्या दूर करावी, अशी विनवणी आमदारांकडे केली आहे. भर उन्हातच हे कर्मचारी ठाण मांडून बसले होते. त्यांना भेटण्यासाठी अनेक नगरसेवक गेले होते. रवी साळुंखे हे देखील तेथे जाऊन त्यांची चौकशी केली. 138 कर्मचाऱ्यांचा हा मुद्दा सर्वसाधारण सभेमध्येही चांगलाच गाजला होता. नियमानुसार त्यांची नियुक्ती झाली नाही. यामुळे त्यांना वेतन देणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या समस्येमुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.









