राजाराम कारखाना उर्जितावस्थेत आणणार; उत्पादन वाढीसाठी ऊस विकास योजना राबविणार; गेली 28 वर्षे सभासद व कामगारांवर अन्याय
कोल्हापूर कृष्णात चौगले
राजाराम सहकारी साखर कारखाना टिकला पाहिजे ही आमची भूमिका आहे. गेल्या 28 वर्षांपासून सभासद, बिगर सभासद आणि कामगारांना सन्मानाची वागणूक मिळालेली नाही. कराराप्रमाणे शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जाण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी कधीही स्विकारली नाही. ‘ऊस तुमचा, तुम्हीच तोडून कारखान्याकडे पाठवा’ असे धोरण त्यांनी राबविले आहे. रिकव्हरी मारली जात असल्यामुळे वर्षानुवर्षे अन्य कारखान्यांच्या तुलनेत नेहमीच कमी दर मिळाला आहे. कामगारांसाठी एकेरी भाषा वापरली जात असून जुलमी कारभाराला ते वैतागले आहेत. त्यामुळे सभासद आणि कामगारांचा कौल छत्रपती राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या बाजूने आहे. आगामी काळात ऊस उत्पादन वाढविण्यासाठी ऊस विकास योजना राबवून सभासदांची अर्थिक उन्नती करू. उसाला अधिकाधिक दर देऊन कामगारांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी स्पष्टोक्ती आमदार सतेज पाटील यांनी तरुण भारत संवादच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.

आमदार पाटील म्हणाले, राजाराम साखर कारखान्याकडे 12 हजार सभासद तर 8 हजार बिगर सभासद शेतकरी ऊस पाठवतात. एकूण 20 हजार शेतकऱ्यांचे अर्थकारण या कारखान्यावर अवलंबून असले तरी सत्ताधारी मंडळीकडून वर्षानुवर्षे ऊस वजनात काटामारी केली जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. पूरबाधित ऊसाची तोड केली जात नाही. याबाबतच्या अनेक तक्रारी निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये स्वत: शेतकऱ्यांनी व्यासपीठावर येऊन व्यक्त केल्या आहेत. हूकूमशाहीच्या कारभाराला कामगारदेखील कंटाळले आहेत. त्यामुळे सभासद आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीच परिवर्तन आघाडीची मोट बांधली आहे.
कारखान्याचे हेक्टरी सरासरी ऊस उत्पादन वाढविणार
राजाराम साखर कारखान्याचे हेक्टरी सरासरी ऊस उत्पादन केवळ 72 टन आहे. अन्य कारखान्यांच्या तुलनेत ते प्रतिहेक्टरी 20 टनांनी कमी आहे. सत्ताधाऱ्यांनी सभासदांचे ऊस उत्पादन वाढविण्यासाठी कधीही ‘ऊस विकास योजना’ राबविली नाही. पण राजाराम कारखान्यावर परिवर्तन आघाडीची सत्ता आल्यानंतर ऊस उत्पादन वाढीसाठी अद्ययावत बियाणे, खते, पाचट व्यवस्थापन, उपसासिंचन योजना राबविल्या जाणार आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे उपलब्ध जमिनीचे तुकडे होत आहेत. परिणामी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी गावातील केवळ चार शेतकऱ्यांच्या जमिनीमधील मातीचे परिक्षण न करता प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीमधील माती परीक्षण करण्यासाठी कारखान्याची स्वतंत्र लॅब उभारली जाईल. ऊस पिकांची काय गरज आहे ? पिकांना कोणत्या खतांची मात्रा देणे आवश्यक आहे ? याची सविस्तर माहिती परिक्षणातून मिळणार आहे. त्यामुळे राजाराम कारखान्याचे सरासरी ऊस उत्पादन निश्चितच वाढेल, असा आशावाद आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
200 एकरसाठी एक शेती मदतनीस
ऊस पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक 200 एकर शेतीसाठी एक शेती मदतनीसाची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना ऊस बियाण्यांपासून खते, पाणी व्यवस्थापन, औषध फवारणी, पाचट आणि किड व्यवस्थापनाबाबत परिपूर्ण माहिती मिळेल. साहजिकच ऊस उत्पादन वाढीसाठी त्याचा मोठा फायदा होईल असे आमदार पाटील यांनी नमूद केले.
एकाच तालुक्यातील ऊसाची रिकव्हरी वेगवेगळी कशी ?
राजाराम साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून येणारा ऊस आणि त्याच कार्यक्षेत्रातील संबंधित तालुक्यातून अन्य कारखान्यांकडे जाणाऱ्या ऊसाची रिकव्हरी वेगवेगळी कशी ? असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला. एकाच तालुक्यातील ऊस दोन कारखान्यांकडे जात असेल तर त्याची सरासरी रिकव्हरी मिळतीजुळती असयला हवी. पण राजाराम कारखान्यामधील सत्ताधारी मंडळीकडून रिकव्हरी मारली जात असल्यामुळे ती कागदोपत्री कमीच दिसत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
शेतकरी हितासाठी ‘परिवर्तन आघाडी’चा वचननामा
- ठिबक सिंचनसाठी एकरी 6 हजार 500 रूपये अनुदान देणार
- सभासदांना प्रति महिना, प्रति सभासद 5 रूपये किलो दराने 7 किलो साखर देणार
- -दिवाळी सणासाठी प्रति सभासद 7 किलो साखर देणार
- -ऊस उत्पादन वाढीसाठी अद्यावत माहिती देण्यासाठी दरवर्षी 500 शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्टिट्यूटकडे पाठविणार
- प्रत्येक 200 एकर ऊस शेतीसाठी एक शेती मदतनीसाची नियुक्ती करणार









