अॅडेन मार्करेम मालिकावीर आणि सामनावीर, नेदरलँड्सचा 146 धावांनी पराभव
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
यजमान दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्स विरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सचा 146 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात 175 धावांची खेळी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या अॅडेन मार्करेमला मालिकावीर आणि सामनावीर असा दुहेरी पुरस्कार मिळाला.
या शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. द. आफ्रिकेने 50 षटकात 8 बाद 370 धावा जमवित नेदरलँड्सला विजयासाठी 371 धावांचे कठीण आव्हान दिले. त्यानंतर नेदरलँड्सचा डाव 39.1 षटकात सर्वबाद 224 धावात आटोपला. द. आफ्रिकेच्या मगालाने 43 धावात 5 गडी बाद केले.
द. आफ्रिकेच्या डावामध्ये मार्करेमने 126 चेंडूत 7 षटकार आणि 17 चौकारांसह 175 तर मिलरने 61 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 91, क्लेसनने 21 चेंडूत 4 चौकारांसह 28, व्हॅन डेर ड्युसेनने 40 चेंडूत 2 चौकारांसह 25 तर जेनसेनने नाबाद 11 धावा केल्या. कर्णधार बेहुमा 6 तर डिकॉक 8 धावांवर बाद झाले. मार्करेम आणि मिलर यांनी पाचव्या गड्यासाठी 199 धावांची भागीदारी केल्याने द. आफ्रिकेला 370 धावांपर्यंत मजल मारता आली. द. आफ्रिकेच्या डावात 11 षटकार आणि 33 चौकार नोंदविले गेले. नेदरलँड्सतर्फे क्लेसन, किंगमा, मिकेरेन यांनी प्रत्येकी 2 तर एस. अहमद आणि आर्यन दत्त यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना नेदरलँड्सच्या डावामध्ये विक्रमजित सिंगने 18 चेंडूत 5 चौकारांसह 21, मॅक्स ओ दाऊदने 49 चेंडूत 8 चौकारांसह 47, मुसा अहमदने 69 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह 61, बॅरेसीने 36 चेंडूत 3 चौकारांसह 29 तर कर्णधार एडवर्ड्सने 33 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 42 धावा जमविल्या. नेदरलँड्सच्या मॅक्स ओ दाऊद आणि मुसा अहमद यांनी दुसऱ्या गड्यासाठी 85 धावांची भागीदारी केली. द. आफ्रिकेच्या मगालाने भेदक गोलंदाजी केल्याने नेदरलँड्सचे तळाचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यांचे शेवटचे 5 गडी 31 धावात तंबूत परतले. नेदरलँड्सच्या डावात 4 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. सिसांदा मगालाने 43 धावात 5, मार्करेमने 40 धावात 2 तसेच एन्गीडी, जेनसन आणि शम्सी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका 50 षटकात 8 बाद 370 (मार्करेम 175, मिलर 91, क्लेसन 28, व्हॅन डेर ड्युसेन 25, जेनसन नाबाद 11, फ्रेड क्लेसन, किंगमा आणि मिकेरेन प्रत्येकी 2 बळी, एस. अहमद आणि आर्यन दत्त प्रत्येकी 1 बळी), नेदरलँडस 39.1 षटकात सर्वबाद 224 (विक्रमजित सिंग 21, मॅक्स ओ दाऊद 47, मुसा अहमद 61, बॅरेसी 29, एडवर्ड्स 42, सिसांदा मगाला 5-43, मार्करेम 2-40, एन्गीडी 1-33, जेनसन 1-39, शम्सी 1-38).









