कॅमेरॉन ग्रीनचे 5 बळी, व्हेरेन, जान्सेन यांची अर्धशतके, डीन एल्गारच्या 5 हजार धावा
वृत्तसंस्था/ मेलबर्न
सोमवारपासून बॉक्सिंग डे दिवशी सुरु झालेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 189 धावात संपुष्टात आला. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 12 षटकात 1 बाद 45 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या ग्रीनने कसोटीत पहिल्यांदाच 5 बळी मिळविले तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गारने कसोटी क्रिकेटमधील आपला 5 हजार धावांचा टप्पा ओलांडला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. मेलबर्नची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला अनुकूल ठरत असल्याने ऑस्ट्रेलियाच्या जलद गोलंदाजांनी त्याचा पुरेपूर फायदा उठविला. ग्रीन, स्टार्क, नवोदित बोलँड यांनी 8 गडी बाद केले तर फिरकी गोलंदाज लियॉनला 1 बळी मिळाला.
कर्णधार एल्गार आणि इर्वी या सलामीच्या जोडीने सावध फलंदाजी करताना 10.4 षटकात 29 धावा जमविल्या. बोलँडने दक्षिण आफ्रिकेची ही जोडी फोडताना इर्विला ख्वाजाकरवी झेलबाद केले. त्याने 31 चेंडूत 3 चौकारांसह 18 धावा जमविल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. 28.3 षटकात त्यांची स्थिती 5 बाद 67 अशी केविलवाणी झाली होती. ग्रीनने डी ब्रुईनला 12 धावांवर झेलबाद केले. कर्णधार एल्गार चोरटी धाव घेण्याच्या नादात लाबुशेनच्या फेकीवर उपाहाराआधी धावचीत झाला. त्याने 2 चौकारांसह 26 धावा केल्या. स्टार्कने बवुमाला तर त्यानंतर झोंडोला बाद केले. बवुमा आणि झोंडो यांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

व्हेरेनी आणि जान्सेन या वैयक्तिक अर्धशतके नोंदवत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरताना सहाव्या गडय़ासाठी 112 धावांची शतकी भागिदारी केल्याने दक्षिण आफ्रिकेला 189 धावांपर्यंत मजल मारता आली. ग्रीनने व्हेरेनीला स्मिथकरवी झेलबाद केले. त्याने 99 चेंडूत 3 चौकारांसह 52 धावा जमविल्या. ग्रीनने त्यानंतर पाठोपाठ जान्सेनला बाद करुन आपल्या संघासमोरील मोठा अडथळा दूर केला. जान्सेनने 136 चेंडूत 10 चौकारांसह 59 धावा झळकविल्या. ग्रीन आणि लियॉन यांनी दक्षिण आफ्रिकेचे शेवटचे 3 फलंदाज केवळ 7 धावात बाद केले. केशव महाराजने 2, रबाडाने 4 तर एन्गिडीने 2 धावा जमविल्या. 68.4 षटकात दक्षिण आफ्रिकेचा डाव 189 धावांवर आटोपला. ग्रीनने 27 धावात 5 तर स्टार्कने 39 धावात 2 तसेच बोलँड आणि लियॉन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाअखेर पहिल्या डावात 12 षटकात 1 बाद 45 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाने सलामीच्या उस्मान ख्वाजाला व्हेरेनीकरवी झेलबाद केले. त्याने 1 धाव जमविली. वॉर्नर आणि लाबुशेन यांनी शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत सावध फलंदाजी करत अधिक पडझड होऊ दिली नाही. वॉर्नर 3 चौकारांसह 32 तर लाबुशेन 5 धावांवर खेळत आहेत. रबाडाने 24 धावात 1 गडी बाद केला. या खेळपट्टीवर मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचे वेगवाग गोलंदाजही प्रभावी ठरतील असा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरची ही शंभरावी कसोटी आहे.
संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका प. डाव – 68.5 षटकात सर्व बाद 189 (व्हेरेनी 52, जेनसेन 59, डी ब्रुयन 12, एल्गार 26, इर्वि 18, ग्रीन 5-27, स्टार्क 2-39, बोलँड 1-34, लियॉन 1-53), ऑस्ट्रेलिया प. डाव – 12 षटकात 1 बाद 45 (वॉर्नर खेळत आहे 32, ख्वॉजा 1, लाबुसेन खेळत आहे 5, रबाडा 1-24).
एल्गारच्या 5 हजार धावा

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गारने या कसोटीत 5 हजार धावांचा टप्पा ओलांडला. या सामन्यात एल्गारने 68 चेंडूत 2 चौकारांसह 26 धावा जमविल्या. एल्गारने कसोटी क्रिकेटमध्ये 81 सामन्यात तसेच 142 धावात 38.18 धावांच्या सरासरीने 5002 धावा जमविल्या असून त्यामध्ये 13 शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा एल्गार हा आठवा फलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू कॅलिसने कसोटी क्रिकेटमध्ये 55.25 धावांच्या सरासरीने 165 कसोटी आणि 276 डावात 13206 धावा जमविल्या असून त्यामध्ये 45 शतके आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे. कॅलिसने कसोटी क्रिकेटमध्ये 224 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. दक्षिण आफ्रिकातर्फे आमलाने 9282, ग्रीम स्मिथने 9253, डिव्हिलियर्सने 8765, गॅरी कर्स्टनने 7289, हर्षल गिब्जने 6167 तर मार्क बाऊचरने 5498 धावा जमविल्या आहेत.
शेन वॉर्नला आदरांजली

ऑस्ट्रेलियाचा जागतिक दर्जाचा फिरकी गोलंदाज दिवंगत शेन वॉर्नला सोमवारी या कसोटी सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी तसेच क्रिकेट शौकिनांनी आदरांजली वाहिली. मेलबर्नच्या क्रिकेट मैदानातील द ग्रेट सदर्न स्टँडला गेल्या मार्चमध्ये दिवंगत शेन वॉर्नचे नाव देण्यात आले आहे. शेन वॉर्नचे 2022 च्या मार्चमध्ये वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले होते. वॉर्नने आपल्या घरच्या म्हणजेच मेलबर्नच्या मैदानावर 2006 च्या डिसेंबर महिन्यात कसोटीतील 700 बळींचा टप्पा ओलांडला होता. वॉर्नच्या या कामगिरीचे स्मरण प्रत्येक ऑस्ट्रेलियन शौकिनाला निश्चितच झाले असणार. शेन वॉर्नला आदरांजली वाहण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी तसेच मैदानावरील चाहत्यांनी पांढऱया फ्लॉपी हॅट्सचा वापर केला होता. वॉर्न हा कसोटी कॅप मिळविणारा आस्ट्रेलियाचा 350 वा खेळाडू होता. त्याचे स्मरण म्हणून मैदानावर ‘वॉर्नी 350’ असे पेंट करण्यात आले होते. सोमवारी पहिल्या कसोटीतील खेळ सुरु असताना स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.50 वा. काहीवेळ खेळ थांबविण्यात आला टाळय़ांचा गजर करीत त्याला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सर्व खेळाडूंनी तसेच क्रिकेट शौकिनांनी उभे राहून शेन वॉर्नला आदरांजली वाहिली. क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे प्रत्येक वर्षी सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड करण्यात येते. पण यापुढे हा पुरस्कार शेन वॉर्नच्या नावे देण्यात येणार असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलिया तसेच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू संघटनेतर्फे देण्यात आली.









