राजकारणात आणि क्रिकेटमध्ये एक साम्य म्हणजे, कोण कुणाचा ऐन मोक्याच्या क्षणी कसा गेम करेल हे सांगता येत नाही. सध्याच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा तर काल अफगाणिस्तानने इंग्लंडचा गेम केला. आम्हाला हलक्यात घेऊ नका हे काल अफगाणिस्तानने पुन्हा एकदा बलाढ्या देशांना ठणकावून सांगितले. इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि पुन्हा एकदा इंग्लंड हे देश ज्यांना आयसीसी इव्हेंटच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर झटका दिलाय. काल पुन्हा एकदा इंग्लंडला हरवत स्पर्धेतून खेचून बाहेर काढलं. इंग्लंडचा विचार केला तर 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांची कामगिरी लौकिकास साजेशी झाली नव्हती. जो रूट, जोस बटलर, आर्चर या मंडळींना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने झकास कामगिरी करत मागच्या विश्वचषक स्पर्धेची उणीव भरून काढायची होती. परंतु अफगाणिस्तानच्या 24 वर्षीय इब्राहिम झद्रनने त्यांचे मनसुबे पुरते धुळीस मिळवले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 177 धावा या प्रतिभावंत गोलंदाजांसमोर. त्याही पहिले तीन फलंदाज चाळीसच्या आत ड्रेसिंगरूम मध्ये परतल्यानंतर त्याने फटकावल्या.
मी कालच म्हटलं होतं अफगाणिस्तानने जर ‘दे धक्का’ दिला तर मात्र स्पर्धेतील रंगत अधिक वाढणार आहे. नेमकं काल तेच घडलं. अफगाणिस्तानने लिंबू टिम्बू हा शिक्का कधीच पुसून काढलाय. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा अफगाणिस्तान संघाकडून झालेला पराभव एक प्रकारे इंग्लंडच्या कानाखाली चापटी होती. कालच्या पराभवाने अफगाणिस्तानने इंग्लंडला खऱ्या अर्थाने बदडवलं. अफगाणिस्तान या देशाचे दरडोई उत्पन्न इतर देशांच्या तुलनेने खूप कमी असेलही. परंतु क्रिकेटमधील त्यांचं धावांचं आणि गडी बाद करण्याचे उत्पन्न हे वर्षानुवर्ष वाढतच चाललंय.
उमरझाईचं कौतुक करावं लागेल. त्याच्याकडे वेग नाहीये. पण अचूक टप्प्यावर सुद्धा क्रिकेटमध्ये बळी मिळू शकतात हे त्याने काल दाखवून दिले. रशीद खान हा काही संघाचा कप्तान नाहीये. परंतु शेवटच्या काही षटकात सगळ्यांना सोबत घेऊन, कानमंत्र देत आपण ही मॅच जिंकू शकतो हे वारंवार सांगत होता. संघात एक लीडर कसा असावा हे रशीद खानने दाखवून दिले. पुन्हा एकदा महत्त्वाच्या षटकात अफगाणिस्तानला प्रेशर झेलता येत नाही का, हा प्रश्न पडला होता. शेवटच्या काही महत्त्वपूर्ण षटकात अफगाणिस्तानच्या बऱ्याच चुका झाल्या होत्या. गचाळ क्षेत्ररक्षण, रशीदने सोडलेला सोपा झेल हा त्यातलाच काही भाग. परंतु सरतेशेवटी उमरझाई धावून आला. पुन्हा एकदा अफगाणिस्तानने टीम स्पिरिट काय असते हे दाखवून दिले. एक वर्षांपूर्वी एका महत्त्वपूर्ण सामन्यात नशीब आमच्यावर ऊसलं होतं. परंतु यावेळी तसे काही घडणार नाही, अशीच काहीशी चुणूक अफगाणिस्तानने दाखवली. दोन-तीन दिवसात नशीब ऊसणार की नाही याचे उत्तर आपल्याला मिळेलच. परंतु तूर्तास तरी अफगाणिस्तानचं अभिनंदन करावे लागेल.
ज्या स्पर्धेत भल्याभल्या संघांची टायटॅनिक बुडत असताना अफगाणिस्तानचा संघ सांघिक कामगिरीवर आपली नय्या पार करत आहे. कधी त्यांचे फलंदाज तर कधी गोलंदाज यांचे मिश्रण त्यांच्या कामी येते. या विजयापूर्वी ही स्पर्धा थोड्या प्रमाणात रटाळ वाटत होती. तुम्हाला दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर आयसीसी इव्हेंटचा फील येत नव्हता. परंतु अफगाणिस्तानच्या या विजयाने मात्र ब गटातील गुंता हा खऱ्या अर्थाने वाढला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टॉप फोरमध्ये आम्हालाही गृहीत धरा, असे ठणकावून अफगाणिस्तान संघ सांगत नसेल तरच नवल.!









