प्रभारी नगररचनाचे सहायक संचालकही रजेवर
नागरिकांवर फेऱ्या मारण्याची वेळ : पूर्ण वेळ अधिकारी केव्हा मिळणार?
कोल्हापूर प्रतिनिधी
महापालिकेच्या नगररचना कार्यालयातील (टिपी) कारभार रामभरोसे झाला आहे. सांगलीच्या नगररचनाचे सहायक संचालक वि. पां. झगडे यांच्याकडे कोल्हापुरातील टिपीतील अतिरिक्त पदभार दिला आहे. तेही प्रशिक्षणामुळे रजेवर आहेत. यामुळे टिपीतील कामे खोळंबली असून नागरिकांची गैरसोय होत आहे.
महापालिकेच्या राजारामपुरीतील नगररचना विभागाला (टिपी) नगररचनाचे सहायक संचालक मिळेना अशी स्थिती झाली आहे. मनपाचे सहायक संचालक नगररचना आर. सी. महाजन यांची 5 जानेवारी 2023 रोजी बदली झाली. तीन महिने झाले तरी राज्य शासनाकडून त्यांच्या जागी पूर्ण वेळ अधिकारी दिलेला नाही. प्रारंभी जिल्हा नगररचनाचे सहायक संचालक अनिल पाटील यांच्याकडे कोल्हापूर शहर नगररचना विभागाचा अतिरिक्त पदभार दिला होता. पाटील निवृत्त झाल्यानंतर सांगलीचे सहायक नगरररचना संचालक वि. पां. झगडे यांच्याकडे कोल्हापूर महापालिका सहायक नगररचना संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. झगडे आठवड्यातून मंगळवार आणि बुधवारी दोन दिवस कोल्हापुरात आणि इतर दिवस सांगलीत असतात. सध्या यशदाच्या प्रशिक्षणासाठी ते रजेवर गेले आहेत. 15 दिवसाचे प्रशिक्षण आहे. राज्यशासनाने या दरम्यान झगडे यांचा पदभार दुसऱ्या कोणलाही दिलेला नसल्याने टिपीतील कारभार रामभरोसे झाला आहे. बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्राची कामे रखडली आहेत. नागरिक ‘टिपी’त फेऱ्या मारून वैतागले आहेत. बेकायदेशीर बांधकाम, अतिक्रमण संदर्भात आलेल्या नागरिकांच्या तक्रारीवरील सुनावणीही रखडलेल्या आहेत.
साडेतीन महिने प्रभारीराज
‘टिपी’त बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना फेऱ्या माराव्या लागतात. यामध्येच भरीत भर नगररचनाचे सहायक संचालकपद प्रभारी आहे. साडेतीन महिने येथे पूर्ण वेळ अधिकारी दिले नसल्याने प्रभारीराजवर कारभार सुरू आहे. महापालिका प्रशासनाने राज्यशासनाने नगररचनाचे सहायक संचालक पूर्ण वेळ देण्याची मागणी करूनही कार्यवाही झालेली नाही.









