विश्व महिला मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप : सवीतीचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताच्या महिला बॉक्सर्स निखत झरीन (52 किलो), परवीन (63 किलो) व मनीषा (57 किलो) यांनी इस्तंबुलमध्ये सुरू असलेल्या आयबीए महिला विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये आपापल्या गटात विजय मिळवित दुसऱया व तिसऱया फेरीत स्थान मिळविले.
झरीनने मेक्सिकोच्या हेरेरा अल्वारेझचा 5-0 असा तर परवीनने युक्रेनच्या मारीया बोव्हावर याच फरकाने मात केली. पहिल्या फेरीत बाय मिळालेल्या मनीषाने नेपाळच्या कला थापावर विजय मिळवित तिसरी फेरी गाठली. दिवसातील शेवटच्या लढतीत सवीतीला (75 किलो) इंग्लंडच्या केरी डेव्हिसकडून 2-3 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला.
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या प्रतिष्ठेच्या स्ट्रँडा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धेत 25 वर्षीय झरीनने सुवर्ण मिळविले होते. तिने येथील लढतीत अल्वारेझवर फारसे श्रम न घेता सहज विजय मिळविला. 2019 मध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविलेल्या झरीनने या लढतीत पूर्ण वर्चस्व राखले होते. लांब रीचचा तिने चांगला उपयोग करून घेतला. तिने या लढतीत आक्रमण करताना अचूक पंचेसचा सढळ वापर केला. तिची पुढील लढत मंगोलियाच्या लुत्सैखानी अल्टानत्सेत्सेगशी होणार आहे. लुत्सैखानीने 2021 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविले होते.
हरियाणाच्या 22 वर्षीय परवीनने युक्रेनच्या अनुभवी बोव्हावर एकमताने विजय मिळविला. ती परवीनपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. परवीनने आक्रमक सुरुवात केली तरी बोव्हाने तोडीस तोड खेळ करीत पहिली फेरी जिंकली. दुसऱया फेरीत मात्र परवीनने खेळ उंचावत पंचेसचा भडिमार करून बोव्हावर अखेर विजय मिळविला. तिची पुढील लढत माजी युवा ऑलिम्पिक चॅम्पियन अमेरिकेच्या जाजैरा गोन्झालेझशी रविवारी होणार आहे. मनीषालाही थापाविरुद्ध विजयासाठी जास्त संघर्ष करावा लागला नाही.
या स्पर्धेत 73 देशातील 310 मुष्टियोद्धय़ांनी भाग घेतला आहे. 2021 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविणारी जस्मिन (60 किलो), अनामिका (50 किलो), शिक्षा (54 किलो) यांच्या पहिल्या फेरीच्या लढती गुरुवारी उशिरा होणार आहेत. जस्मिनची लढत थायलंडच्या युवा आशियाई चॅम्पियन पॉर्नटिप बुआपाविरुद्ध होणार आहे तर अनामिकाची लढत रोमानियाच्या युजेनिया ऍन्घेलविरुद्ध होईल. पहिल्या फेरीत बाय मिळालेल्या शिक्षाची दुसऱया फेरीची लढत अर्जेन्टिनाच्या हेरेरा मिलाग्रोस रोजारिओशी होणार आहे. 2019 मध्ये रशियात झालेल्या शेवटच्या स्पर्धेत भारताने 1 रौप्य व तीन कांस्यपदके मिळविली होती.









