नवीन सीईओ पदभार घेण्यासाठी इच्छूक नसल्याची माहिती
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डला कायमस्वरुपी सीईओ नियुक्त करूनही ते रुजू न झाल्याने कॅन्टोन्मेंटचा कारभार प्रभारींवरच सुरू आहे. नियुक्तीचा आदेश येऊन 12 ते 13 दिवस उलटले तरी अद्याप नवीन सीईओंनी पदभार स्वीकारला नाही. यामुळे चर्चांना उधान आले असून नवीन सीईओ पदभार का स्वीकारत नाहीत? हा प्रश्न अनुत्तरित आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डचे तत्कालीन सीईओ के. आनंद यांनी 25 नोव्हेंबर रोजी जीवन संपविले. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये अनेक हालचाली घडून आल्या. तात्पुरत्या स्वरुपात बेंगळूर येथील अजित रे•ाr यांची प्रभारीपदी नेमणूक करण्यात आली. परंतु अवघ्या चार दिवसांमध्ये त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये कायमस्वरुपी सीईओ म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. 1 डिसेंबर रोजी नियुक्तीचे आदेश बजावूनदेखील अद्याप राजीव कुमार यांनी पदभार स्वीकारलेला नाही. मागील महिन्यात कॅन्टोन्मेंट बोर्डमधील गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करण्यात आली. सीबीआयचा अहवाल येण्यापूर्वीच सीईओ के. आनंद यांनी आपले जीवन संपविले. असे असले तरी यापुढील काळातही सीबीआय चौकशी सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन सीईओ पदभार घेण्यासाठी इच्छूक नसल्याची माहिती मिळत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या या सर्व घडामोडींमुळे सर्वसामान्यांची कामे मात्र रेंगाळली आहेत.
राजीव कुमार यांच्या नियुक्तीचे आदेश
तत्कालीन सीईओ के. आनंद यांच्या मृत्यूनंतर कॅन्टोन्मेंट बोर्डला अद्याप कायमस्वरुपी सीईओ मिळालेले नाहीत. राजीव कुमार यांच्या नियुक्तीचे आदेश बजावण्यात आले असून त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही.
-सुधीर तुपेकर (कॅन्टोन्मेंट सदस्य)









