राहुल गांधी यांचा आग्रह : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची घेतली भेट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अदानींवरील चर्चेपासून भाजपने कितीही पळ काढला, तरी आम्ही तो मुद्दा सोडणार नाही, असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला. या मुद्यावर बुधवारी त्यांनी लोकसभा सभापतींची भेट घेत भाजप सभागृहात अदानींवरील चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. बैठकीनंतर ते म्हणाले की, विरोधकांना सभागृह चालवायचे असून शुक्रवार, 13 डिसेंबरला संविधानावर चर्चा करायची आहे. तसेच उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील आरोपांवर चर्चा करण्यापासून भाजप पळून जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सभापतींसोबतच्या भेटीचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी बिर्ला यांना त्यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पण्या काढून टाकण्याची विनंती केली होती. याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन सभापतींनी दिले आहे.
लोकसभेत मणिपूरचा मुद्दा उपस्थित
लोकसभेमध्ये बुधवारी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मणिपूरमधील बिघडलेल्या परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला कधी जाणार आणि गृहमंत्री अमित शहा या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय पावले उचलत आहेत याची माहिती सभागृहाला कधी देतील, असा सवाल त्यांनी केला. तसेच जॉर्ज सोरोस यांचा मुद्दा उपस्थित करून भाजप सरकारचे अपयश लपवत असल्याचा आरोपही गोगोई यांनी केला.
भाजपकडून काँग्रेसची कोंडी
वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सभागृहात उत्तर देताना मणिपूरमधील परिस्थितीवर सरकार आवश्यक पावले उचलत असल्याचे सांगितले. काँग्रेस आणि बाह्य शक्ती यांच्यात साखळी असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. काँग्रेस आणि जॉर्ज सोरोस यांच्यात संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच ‘जॉर्ज सोरोस यांचे त्यांच्या नेत्याशी इतके घनिष्ठ संबंध का आहेत?’ अशी विचारणाही गोयल यांनी केली.
यापूर्वी मंगळवारीही गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून सुरू झाले असून ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. पहिल्या दिवसापासून दोन्ही सभागृहात गदारोळ झाल्याने कामकाज विस्कळीत स्वरुपात सुरू आहे. संसदेमध्ये आमच्या मागण्यांवर रितसर विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली.









