रत्नागिरी :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, असे सूचक विधान भाजप नेते आणि मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांनी रविवारी केले. कार्यकर्त्यांची हीच इच्छा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शहरात रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची आहे. आम्ही त्यांना पक्ष बांधणीसाठी काम सांगतो, मजबूत करण्यासाठी सांगतो. मग पक्षाची हीच ताकद निवडणुकीमध्ये देखील दिसली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या या भावना वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवाव्यात असे म्हटल्याचेही राणे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, शिवसेनेने (शिंदे गट) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती म्हणून लढणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले असले, तरी भाजपमध्ये मात्र या संदर्भात वेगळा सूर उमटताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सुतोवाच राणे यांनी केले आहे.
सध्या रत्नागिरी जिह्यात जागा महायुती म्हणून लढण्यांवरून बोलले जात असताना, राणे यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. रत्नागिरीत एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
- रोहित पवार शरीराने पवारांसोबत, मनाने भाजपमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते रोहित पवार यांच्यासंदर्भात नीतेश राणे म्हणाले, रोहित पवार शरीराने शरद पवार यांच्यासोबत आहेत, पण मनाने ते भाजपमध्ये आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी रोहित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले, 2019 मध्येच रोहित पवार भाजपमध्ये येणार होते. रोहित पवार भाजपच्या मंत्र्यांना कधी कधी भेटतात हे देखील बघा, असे सूचक विधान करत महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना तोंड फोडले आहे.








