प्रतिनिधी/ बेळगाव
गुणवत्ता आणि दर्जा याबाबत तडजोड न करता भारतीय इंजिनिअर्स जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. एका अर्थाने जागतिक पातळीवर भारतीय इंजिनिअर्समुळेच या क्षेत्राच्या कक्षा रुंदावत असून त्याची प्रगती होत आहे, असे विचार एआयसीटीईचे चेअरमन प्रा. टी. जी. सीताराम यांनी मांडले.
केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेळगावचा आठवा दीक्षांत सोहळा शनिवारी उद्यमबाग येथील सिल्व्हर ज्युबिली ऑडिटोरियम येथे पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सीताराम उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना चॅट जीपीटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर कॉलेजचे माजी विद्यार्थी व बेंगळूर येथील संख्या लॅब्सचे सीईओ पराग नाईक, संस्थेचे अध्यक्ष अॅड. अनंत मंडगी, चेअरमन प्रदीप सावकार, प्राचार्य डॉ. एम. एस. पाटील, कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन राजेंद्र बेळगावकर, संस्थेचे उपाध्यक्ष राम भंडारे, डी. व्ही. कुलकर्णी, सेक्रेटरी व्ही. जी. कुलकर्णी, एस. व्ही. गणाचारी, प्रमोद काटवी, विनायक लोकूर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक, रौप्यपदक व कांस्यपदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. इंजिनिअरिंग तसेच एमटेक विद्यार्थ्यांचा गौरव झाला.
संस्थेचे अध्यक्ष अनंत मंडगी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी आपल्या तत्त्वांशी तडजोड करू नका, असे स्पष्ट केले. पराग नाईक यांनीही आपल्या व्यावसायिक जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. चेअरमन प्रदीप सावकार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राजेंद्र बेळगावकर यांनी स्वागत केले.









