रत्नागिरी पोलीस, एटीएसची संयुक्त कारवाई
प्रतिनिधी/ रत्नागिरी
केरळ येथे धावत्या रेल्वेगाडीत अग्नीकांड घडवून मुंबईच्या दिशेने पसार झालेल्या आरोपीच्या रत्नागिरीत मुसक्या आवळण्याची मोठी कारवाई रत्नागिरी पोलीस व केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकांनी संयुक्तरित्या केली. शाहरुख सैफी (30) हा संशयित रेल्वे प्रवासादरम्यान जखमी अवस्थेत खेडमध्ये दिसून आल्यानंतर त्याला उपचारासाठी दाखल केले होते. पण डॉक्टरवर हल्ला करणे, उपचारादरम्यान पळून जाणे असे त्याचे उपद्व्याप सुरू राहिले होते. मात्र पोलिसांनी त्याला पुन्हा हुडकून काढत अटक केली.
रत्नागिरी रेल्वेस्थानकावर मंगळवार 4 एप्रिल रोजी संशयित आरोपी शाहरूख सैफी याला पोलिसांनी मोठय़ा शिताफीने अटकेची कारवाई करण्यात यश मिळवले. तो मुंबईकडे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच ही मोठी कारवाई करण्यात आली.
केरळमध्ये रेल्वे प्रवाशांना पेटवून देत झाला होता फरार
केरळमध्ये 3 एप्रिल रोजी रात्री 9.45 वा. अल्लपुझा कन्नुर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसमध्ये शाहरुख सैफी याचा सह प्रवाशासोबत जोरदार वादावादीची घटना घडली होती. त्या झालेल्या वादातून सैफीने त्या प्रवाशांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवले होते. त्या आगीचा भडका रेल्वेच्या डब्यात पसरला होता. त्या प्रकाराने भयभीत झालेल्या काही प्रवाशांनी चालत्या रेल्वेमधून बाहेर उडय़ा मारल्या. या घटनेत 3 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर 9 जण गंभीर जखमी झाले होते. या खळबळजनक घटनेनंतर संशयित पसार झाला होता. या संशयिताचा केरळ पोलिसांसह केंद्रीय गुप्तचर यंत्रणा शोध घेत होती.
खेड रेल्वेस्थानकावर जखमी अवस्थेत दिसला
घडलेल्या त्या घटनेनंतर संशयित कोकण रेल्वेमार्गाने मुंबईच्या दिशेने जात होता. खेडजवळील करंजाडी रेल्वेस्टेशनजवळ रेल्वेगाडी क्रॉसिंगसाठी थांबली होती. यावेळी रेल्वेगाडीतून उतरुन सैफी हा मुख्य रस्त्यावर आला. त्या परिसरातील ग्रामस्थांची नजर जखमी अवस्थेत असलेल्या सैफवर पडली. त्याच्या डोक्याला असलेली मोठी जखम पाहून ग्रामस्थांनी त्याची माहिती आरोग्य यंत्रणेला दिली. पण तो रेल्वे अग्निकांडातील आरोपी असावा, याचा कुणालाच मागमूस नव्हता. तो रेल्वेतून पडलेला प्रवासी असल्याचा संशय ग्रामस्थांना होता.
उपचारादरम्यान डॉक्टरवर हल्ला करून फरारी
करंजाडी येथील आरोग्य केंद्रात शाहरूख सैफीवर प्राथमिक उपचार करुन त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात 108 रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले होते. ही रुग्णवाहिका कामथेदरम्यान आलेली असताना रुग्णवाहिकेतील डॉक्टरवर त्याने हल्ला केला. मला औषधोपचाराची गरज नसून मी चांगला असल्याची त्याची बडबड सुरू होती. त्याचवेळी रुग्णवाहिकेतून उतरुन तो पळून गेला. दरम्यान, हा प्रकार संबंधितांनी सावर्डे पोलिसांना कळवला. त्यानंतर लगेच सावर्डे पोलिसांनीही महामार्गावर शोध घेऊन त्याला हुडकून काढले. सैफीला पोलीस गाडीत बसवून कामथे रुग्णालयात पुन्हा आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱयाला केलेल्या हल्ल्याबाबत त्यांनी पोलीस यंत्रणेकडे तक्रार देण्यास नकार दिला होता.
कामथेत उपचार करून पुढील उपचारासाठी रत्नागिरीत धाडले
त्यानंतर कामथे येथे त्याच्यावर पुन्हा उपचार करुन त्याला 4 एप्रिल रोजी रात्री जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र येथेही त्याने आपल्याला ऍडमिट न करण्याचा तगादा लावला होता. केरळ येथून निघाल्यानंतर सैफीने मोबाईल बंद करुन ठेवला होता. त्यामुळे तपास करणाऱया यंत्रणांना त्याचा शोध लागत नव्हता. याचदरम्यान त्याने स्वीच ऑफ करुन ठेवलेला मोबाईल जिल्हा रुग्णालयात सुरु केला. त्यातून नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो तपास यंत्रणांच्या रडारवर आला. त्याचे लोकेशन पोलिसांना मिळाले होते.
जिल्हा रुग्णालयातून फरार होताच रेल्वेस्थानकावर जेरबंद
याचदरम्यान शाहरूख सैफीने मंगळवारी सकाळी 6च्या दरम्यान जिल्हा रुग्णालयातूनही पळ काढला. पळण्यापूर्वी त्याने मोबाईल बंद केला होता. रत्नागिरी शहरात रत्नागिरी पोलिसांनी विविध पथके तयार करुन रुग्णालयातून पसार झालेल्या शाहरुख सैफीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यात महाराष्ट्र एटीएसचे रत्नागिरीतील कर्मचारी, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे कर्मचारी, रत्नागिरी एटीएस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांमार्फत त्याचा सर्वत्र ठावठिकाणा घेण्याचे काम सुरू होते. यावेळी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री शाहरुख सैफी पोलिसांच्या नजरेस पडताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
सैफी केरळ पोलिसांच्या स्वाधीन
महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱयांना त्याची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच एटीएसचे पथक रत्नागिरीत मार्गस्थ झाले. या पथकातील पोलीस निरीक्षक पोळ व कर्मचाऱयांनी रत्नागिरीत येऊन शाहरुख सैफी याची चौकशी केली. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, केरळ येथील घटनेला जबाबदार असणारा शाहरुख सैफीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सैफी याची माहिती केरळ पोलिसांना देण्यात आली. केरळ पोलिसांचे पथक बुधवार 5 एप्रिल रोजी सकाळी रत्नागिरीत दाखल झाले. शाहरुख सैफीला गुन्हय़ाच्या तपासासाठी केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.









