आरोपींकडून धागेदोरे नष्ट केल्याचा संशय : चौकशीसाठी मुदत वाढवण्याची ग्वाही
प्रतिनिधी/ चिकोडी
हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाचे संस्थापक आचार्य श्री 108 कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येप्रकरणी चिकोडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नारायण माळी व हसन ढालाईत या आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींना पोलिसांनी हिंडलगा कारागृहातून चिकोडी येथील जेएमएफसी न्यायालयात हजर केले. तसेच त्यांना 14 दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने त्यांना 7 दिवस पोलीस कोठडी देण्यास अनुमती दिली.

मंगळवारी सकाळी चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यल्लिगार, पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी हिंडलगा कारागृहाला भेट देऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. 5 रोजी कामकुमारनंदी महाराज यांची हत्या करून त्यांचा मृतदेह तुकडे करुन रायबाग तालुक्यातील कटकभावी येथील कूपनलिकेमध्ये या दोघांनी टाकला होता. जैन मुनी बेपत्ता झाल्याबाबत शुक्रवार 7 रोजी चिकोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. शनिवार 8 रोजी जैन मुनींचा तुकडे करून कूपनलिकेत टाकण्यात आलेला मृतदेह पोलिसांनी अथक परिश्रमातून बाहेर काढला. रविवार 9 रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
चिकोडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांची अधिक चौकशी केल्यास या प्रकरणातील धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. याशिवाय या दोन्ही आरोपींनी मुनी महाराजांच्याकडे असलेल्या नोंदी असलेल्या डायरी व इतर वस्तू असे साक्षी पुरावे नष्ट केले असल्याचा पोलिसांना संशय आहे. या संपूर्ण चौकशीसाठी पोलिसांनी जेएमएफसी न्यायालयाचे न्यायाधीश चिदानंद बडिगेर यांच्याकडे या दोन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.
न्यायाधीशांनी याप्रकरणी चौकशीसाठी 7 दिवसांची दोघांनाही पोलीस कोठडी दिली आहे. शिवाय या काळात त्यांना कोणत्याही प्रकारची हिंसा व मारहाण केली जाऊ नये अशी सूचनाही दिली आहे. चौकशीसाठी आणखीन गरज पडल्यास मुदत वाढवून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. प्रारंभी हिंडलगा येथून आणण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची चिकोडी येथील सरकारी सार्वजनिक रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.









