मॉकड्रील असल्याचे समजल्यानंतर सर्वांचा सुटकेचा निःश्वास
प्रतिनिधी /बेळगाव
स्थळ कॅसलरॉक यार्ड… अपघात झाल्याने रेल्वे कर्मचारी, एनडीआरएफ, एसडीआरएफ यांची धावपळ…. अपघातातील जखमींना बाहेर काढण्यासाठी चालविलेली बचाव मोहीम हे वातावरण पाहून बघ्यांचीही गर्दी वाढली होती. परंतु हे मॉकड्रील असल्याचे समजल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर कशाप्रकारे मदत कार्य करावे यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेकडून मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. लोंढा-वास्को मार्गावरील कॅसलरॉक रेल्वे स्टेशनच्या यार्डमध्ये मॉकड्रील घेण्यात आले. अपघात झाल्याचे समजताच रेल्वे कर्मचाऱयांकडून रेल्वे पोलीस, एनडीआरएफ व एसडीआरएफ यांना संपर्क साधण्यात आला. तातडीने बचाव मोहीम राबवून जखमींना रेल्वेच्या बोगीतून बाहेर काढले जात होते. यामुळे कर्मचाऱयांना प्रत्यक्ष अपघातप्रसंगी काम करण्याची माहिती मिळत होती.
नियमावलीनुसार मॉकड्रील हा करावाच लागतो. यामुळे कर्मचारी किती सतर्क आहेत हे समजून येते. नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालखेडे, आलोक तिवारी, जे. एस. रुद्रस्वामी यांच्यासह एनडीआरएफ, एसडीआरएफ, फायर ब्रिगेड, वनविभागाचे कर्मचारी, राज्य पोलीस वैद्यकीय पथक या सर्वांनी एकत्रितरीत्या मॉकड्रीलमध्ये सहभाग घेतला होता.









