हिरेबागेवाडी पोलिसांकडून तातडीने कारवाई
बेळगाव : न्यायालयात हजर करण्यासाठी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून आणलेल्या चोरी प्रकरणातील एका संशयिताने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. चार तासात हिरेबागेवाडी येथे पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली आहे. अब्दुलगणी शब्बीर शेख (वय 28) असे त्याचे नाव आहे. अमलीपदार्थ विक्री व चोरी प्रकरणात तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. गुरुवारी टिळकवाडी पोलिसांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून त्याला ताब्यात घेऊन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने पुन्हा त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला. याच दरम्यान पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अब्दुलगणीने दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पलायन केले. त्यामुळे एकच धावपळ उडाली. मार्केट पोलीस स्थानकात एफआयआरही दाखल करण्यात आला.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. अब्दुलगणीच्या शोधासाठी सर्वत्र पोलीस यंत्रणा कामाला लागली. हिरेबागेवाडी येथील मोमीन गल्ली येथे सायंकाळी हिरेबागेवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक तुकाराम निलगार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश ए. वाय., एस. बी. बाबण्णावर, नागाप्पा सुतगट्टी आदींनी अब्दुलगणीच्या मुसक्या आवळून हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात आणले. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्याला टिळकवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अब्दुलगणीवर बेळगाव ग्रामीण, एपीएमसी, उद्यमबाग व टिळकवाडी पोलीस स्थानकात पाच गुन्हे दाखल झाले आहेत. चोरीप्रकरणात सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यावर अमलीपदार्थ विक्री प्रकरणातही गुन्हे आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्यानंतर केवळ चार तासात त्याला अटक केली आहे.
पथकाला 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर
केवळ चार तासात अब्दुलगणीला अटक करणाऱ्या पोलीस पथकाला 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी तातडीने कारवाई करणाऱ्या पोलिसांना रोख बक्षीस जाहीर केले आहे.









