प्रशिक्षक श्रीनाथ नारायणकडून धोनीशी तुलना, जागतिक विजेती होण्याची क्षमता असल्याचे मत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची 88 वी ग्रँडमास्टर आणि विश्वचषक विजेती दिव्या देशमुख हिचे वर्णन करताना तिचे प्रशिक्षक श्रीनाथ नारायणन यांनी महान क्रिकेटपटू एम. एस. धोनीशी तिची तुलना केली आहे. त्यांच्या मते, या 19 वर्षीय बुद्धिबळपटूच्या शांतपणे लढण्याच्या वृत्तीची तुलना धोनीशीच करता येईल.
जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या फिडे महिला विश्वचषक स्पर्धेत कोनेरू हम्पीसारख्या दुप्पट वयाच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून दिव्या भारतीय बुद्धिबळातील लक्षणीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या वाढत्या यादीचा भाग बनली आहे. हा अंतिम सामना भारताच्या वाढीचा पुरावा आहे आणि तो टायब्रेकरपर्यंत पोहोचला यावरून देशाच्या प्रतिभेची ताकद लक्षात येते. 38 वर्षीय हम्पी ही सर्वांत यशस्वी खेळाडूंपैकी एक असून ती दोन दशकांहून अधिक काळापासून भारतीय महिला बुद्धिबळाचे नेतृत्व करत आहे. तिने दोन जागतिक रॅपिड चॅम्पियनशिप, दोन आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदके यासह असंख्य पदके जिंकली आहेत आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील सुवर्णपदक विजेत्या संघाचाही ती भाग होती. दिव्याने तिच्याविऊद्ध विजय मिळवणे हा भारतीय बुद्धिबळासाठी एक गौरवशाली क्षण आहे.
दिव्या खूपच आक्रमक खेळाडू आहे. पण काळाबरोबर दिव्या अधिक अष्टपैलू, अधिक बहुमुखी बनली आहे. मला वाटते की, ती सर्व वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्झमध्ये तितकीच चांगली आहे, असे श्रीनाथने चेन्नईहून फोनवर बोलताना सांगितले. ‘तिची ताकद मला वाटते त्या मोठ्या क्षणांमध्ये, कठीण परिस्थितीत दिसून येते. महेंद्रसिंह धोनी शेवटच्या षटकात सामने जिंकत असे. शेवटच्या फेरीतील परिस्थितीत किंवा उच्च दबावाच्या क्षणांमध्ये दिव्यामध्ये मी असेच काही तरी पाहिले. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये दबावाखाली तिने अविश्वसनीय पद्धतीने चांगली कामगिरी केली’, असे श्रीनाथ यांनी सांगितले.
2020 पर्यंत नागपूरच्या या खेळाडूचे प्रशिक्षक राहिलेले श्रीनाथ म्हणतात की, 2018 मध्येच त्यांना तिच्यातील प्रतिभा कळली होती. त्यांना असेही वाटते की तिच्यात जागतिक विजेती होण्याची क्षमता आहे, कारण ती पॅंडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. दिव्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवरून असे दिसून येते की, ती उत्साही आहे आणि आव्हान स्वीकारण्यास तिला आवडते. ऑलिंपियाडमध्ये तीन वेळा सुवर्णपदक विजेती राहिलेल्या दिव्याने आशियाई अजिंक्यपद, जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद तसेच जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेतही अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत. तथापि, महिला विश्वचषकात उतरून काही मोठ्या नावांना हरवताना केवळ नशिबाची साथ पुरेशी नव्हती आणि येथेच तिची प्रतिभा समोर आली.









