बेळगाव : यूनियन बँक ऑफ इंडिया, बेळगाव विभागीय कार्यालयातर्फे २५ वी अर्धवार्षिक बैठक नुकतीच पार पडली. यावेळी नगर राजभाषा कार्यान्वयन समिती (बँक व विमा) भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाचे उपसंचालक अनिर्बान कुमार विश्वास यांनी सांगितले की, कार्यालयीन कामकाजात तसेच संपर्क भाषेच्या रूपात हिंदीचा वाढता वापर समाजातील सर्व स्तरातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो. ते बैठकीत कंठस्थ टू पॉईंट झिरो आणि भाषिणी सॉफ्टवेअरच्या वापराबाबत माहिती देत हिंदी व प्रादेशिक भाषांमधून ग्राहकांशी प्रभावी संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. एलआयसीचे विभागीय प्रबंधक डी. शशिकुमार यांनी राजभाषा हिंदीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.
यूनियन बँकेचे उपप्रादेशिक प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमात उत्कृष्ट राजभाषा कार्यान्वयनाबद्दल पुरस्कार देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पुरस्कार युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, भारतीय जीवन विमा महामंडळ व बँक ऑफ इंडिया यांना मिळाले. द्वितीय व तृतीय पुरस्कार भारतीय स्टेट बँक, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, इंडियन ओव्हरसीज बँक, न्यू इंडिया अश्युरन्स व बँक ऑफ महाराष्ट्र यांना प्रदान करण्यात आले. तसेच अंताक्षरी व सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांनाही गौरवण्यात आले. कार्यक्रमात विविध बँक व विमा कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व राजभाषा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाकरिता सचिव व राजभाषा अधिकारी वेद प्रकाश, गणेश गुजर तसेच राजकिरण बोरकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.









