प्रथमच मोबाईल अॅपद्वारे सर्व पाळीव पशु पक्ष्यांची गणना करण्यात येणार
खानापूर : देशपातळीवरील 21 वी पशु गणना 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असून ती 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या काळात तालुक्यातील सर्व पाळीव पशु, पक्ष्यांची गणना करण्यात येणार आहे. तालुक्यात 21 विभागातून ही गणना मोबाईल अॅपद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व पशु पक्ष्यांची माहिती या अॅपद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे, अशी माहिती खानापूर तालुका पशू संगोपन खात्याचे सहाय्यक संचालक ए. एस. कोडगी यांनी दिली. माहिती देताना ते म्हणाले, यापूर्वी पशु, पक्ष्यांची गणती करताना पुस्तकात नेंद करावी लागत होती. यावेळी दोनशे कॉलम माहिती भरावी लागत होती. मात्र अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे नेटवर्क उपलब्ध नसताना ही पशूगणना करण्यात येणार आहे. पुढील चार महिने ही पशूगणना चालणार आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागासाठी 19 गणतीदार तर शहरी विभागासाठी एका गणतीदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या 20 गणतीदारांवर 4 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच या सर्वांना गणतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तालुक्यातील पाळीव पशु, पक्ष्यांची अचूक माहिती घेण्याचे मार्गदर्शनही या शिबिरात करण्यात आले आहे. डॉ. कोडगी पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकरी व पशू पालक कोणकोणत्या जातीचे पशुपालन करत आहेत. यातून रोजगारीचा उपलब्धता, दुग्ध व्यवसायातील सहभाग तसेच पशु, पक्षी पालनासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, आणि शेतकऱ्यांना प्रयोगशील शेतीबरोबर पशू, पक्षी पालनाचा जोड व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याच्या हेतूने हे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.









