वृत्तसंस्था/विझाग
शुक्रवारी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून येथे 12 व्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेला प्रारंभ होत आहे. तब्बल सात वर्षानंतर प्रो कबड्डी लीगचे विझागमध्ये पुनरागमन होत आहे. यजमान तेलुगू टायटन्स आणि तामिळ थलैवाज यांच्यात सलामीचा सामना खेळविला जाईल. त्यानंतर शुक्रवारचा दुसरा सामना बेंगळूर बुल्स आणि पुणेरी पलटण यांच्यात खेळविला जाईल. हा सामना येथील विश्वांध स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर आयोजित केला आहे. तेलगु टायटन्सचे नेतृत्व विजय मलिक करीत आहे. तामिळ थलैवासचे कर्णधारपद स्टार रायडर पवन सेहरावतकडे सोपविण्यात आले आहे. 29 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान 12 व्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील पहिला टप्पा खेळविला जाणार आहे. त्यानंतर जयपूरमध्ये 12 ते 28 सप्टेंबर दरम्यान दुसरा टप्पा, 29 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान तिसरा टप्पा, 11 ते 23 ऑक्टोबर दरम्यान चौथा टप्पा नवी दिल्लीत होणार आहे. मात्र प्ले ऑफ गटातील सामने तसेच अंतिम सामन्याचे ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. शुक्रवार हा संपूर्ण देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिनाचे औचित्य साधून प्रो लीग हंगामातील लिजेंट्स अॅथलिट्सचा खास गौरव करण्यात येणार आहे.









