उमदी येथे चक्काजाम आंदोलन, सात ते आठ किमी वाहतूक ठप्प
उमदी :
“आम्ही कर्जमाफीची मागणी केली नाही, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून ७/१२ कोरे करण्याची घोषणा केली होती. त्यामुळेच आम्ही कर्जमाफी मागतो आहोत,” असे प्रतिपादन तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी उमदी येथे झालेल्या चक्काजाम आंदोलनात केले.
प्रहार जनसुराज्य पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आवाहनावरून संपूर्ण राज्यात कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर उमदी येथील विजयपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी १० वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात तालुका पाणी संघर्ष समिती, प्रहार जनसुराज्य पक्ष, प्रहार दिव्यांग संघटना, शेतकरी संघटना आणि इतर घटकांनी सहभाग घेतला. कर्जमाफीच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला आणि रस्ता रोको आंदोलनास प्रारंभ झाला. या आंदोलनामुळे महामार्गावर सुमारे ७ ते ८ किलोमीटर अंतरावर वाहतूक ठप्प झाली होती.
या आंदोलनात निवृत्ती शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस नेते, सचिन होर्तीकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष, लक्ष्मण कोळी, रियाज शेख प्रहार दिव्यांग संघटना नेते, मळसिद्ध कांबळे सांगली जिल्हा समन्वयक, प्रहार दिव्यांग संघटना, रवींद्र सुरगोंड तालुका उपाध्यक्ष, प्रहार दिव्यांग संघटना, सिराज कोकणे युवक अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलन स्थळी उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनाच्या शेवटी मंडळ अधिकारी सौ. जाधव मॅडम यांनी आंदोलकांकडून निवेदन स्विकारले.








