सभापती रमेश तवडकर यांची माहिती : श्री बलराम फाऊंडेशनतर्फे वर्षभरात गरिबांची शंभर घरे उभारणार,‘एक रूपया व श्रमदान करा’ गरजूंचे घर उभारूया
धारबांदोडा : श्री बलराम चॅरिटेबल फाऊंडेशनच्या श्रम धाम या उपक्रमातून येत्या दीड महिन्यात श्रीमती तृप्ती गावकर हिला नवीन घर बांधून देण्याचा संकल्प सभापती रमेश तवडकर यांनी जाहीर केला आहे. गेल्या महिन्यात पावसामुळे श्रीमती तृप्ती गावकर हिच्या मातीच्या घराची भिंत कोसळून लाखोंचे नुकसान झाले होते. या प्रकाराची दखल घेऊन सभापती रमेश तवडकर आणि सावर्डेचे आमदार गणेश गावकर व पंचायत मंडळाने रविवारी धारगे साकोर्डा येथे भेट देऊन घराची पाहणी केली. श्री बलराम चरिटेबल फाऊंडेशन ही खाजगी संस्था असून या संस्थेच्या श्रमधाम या उपक्रमातून काणकोण तालुक्यात आतापर्यंत वीस घरे बांधून देण्यात आली आहेत. या उपक्रमाचा विस्तार संपुर्ण गोव्यात व्हावा अशी संस्थेची ईच्छा असून यावर्षी संपुर्ण गोव्यात सुमारे शंभर घरे बांधून देण्याचा संकल्प असून त्याची सुरूवात धारगे येथील तृप्ती गावकर यांच्यापासून होणार आहे अशी माहिती रमेश तवडकर यानी यावेळी दिली.
प्रत्येकाने ‘एक रूपया व श्रमदान’ करून उपक्रमाला हातभार लावा
या उपक्रमाला आर्थिक सधन असलेल्या व्यक्तीनी हातभार लावावा तसेच स्थानिक व्यक्तीनी व पंचयात मंडळांनी हातभार लावल्यास हे काम अधिक सोपे होणार आहे. प्रत्येकाने ‘एक रूपया व श्रमदान’ करावे असे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. पुर्वीच्या काळी पैशाल महत्व न देता श्रमाल महत्व देऊन एकमेकांना मदत करण्याची परंपरा होती, त्dयाच संकल्पनेतून श्रमधाम या उपक्रमाला चालना देण्यात आली आहे असे ते पुढे बोलताना म्हणाले. सध्या गोव्यात दोन ते तीन टक्के लोक आहे ज्याना अशाप्रकारची गरज आहे. लोक भावनेच्या नजरेतून नागरिक पुढे आल्यास जगाच्या नकाशावर गोव्याची नोंद घेतली जाईल असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
श्रमधाम उपक्रम देशभरात चर्चेचा विषय
श्रमधाम उपक्रम गोव्याबरोबरच संपुर्ण देशात लोकप्रिय ठरत असून लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी या उपक्रमाचे स्तुती केली आहे. या उपक्रमाची संकल्पाना सावर्डे मतदारसंघातील लोकांना समजावी व त्याची अंमलबजावणी सावर्डे मतदारसंघात व्हावी यासाठी आपण सभापती बरोबर चर्चा केली. सभापतीने होकार देऊन प्रत्यक्ष भेट देऊन कोसळलेल्या घराची पाहणी करण्याचा मनोदय व्यक्त केला. हा उपक्रम अंत्यत स्त्युत्य असून या उपक्रमातून आधार नसलेल्या लोकांना आश्रय मिळणार असे आमदार गणेश गावकर यावेळी म्हणाले. यावेळी साकोर्डा सरपंच प्रिया खांडेपारकर, उपसरपंच शिरीष देसाई, पंचसदस्य महादेव शेटकर, संजना नार्वेकर, जितेंद्र कालेकर, गायत्री मापारी, कुळे पंचयातीचे सरपंच गोविंद शिगांवकर, श्री बलराम चेरिटेबल फाऊंडेशनचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.









